सहारा उद्योगसमूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना शुक्रवारी लखनऊत अटक करण्यात आली. गुंतवणूकदारांना २० हजार कोटी रुपये परत न केल्याच्या प्रकरणी खटल्यात वारंवार गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्यात आले होते.
पोलिसांना सहारा शहर येथे बोलावून सुब्रतो रॉय यांनी शरणागती पत्करली. ट्रान्स गोमतीचे पोलीस अधीक्षक हबीबुल हासन यांनी सांगितले की,  रॉय यांना अटक झाली असून त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येईल. ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्या. के. एस. राधाकृष्णन यांच्या पुढे सांगितले की, रॉय यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आल्याने त्यांच्यावरील अजामीनपात्र अटक वॉरंट मागे घेण्यात यावे. त्यांच्या या अर्जावर विशेष पीठापुढे आजच सुनावणी शक्य नसल्याचे न्यायालयाने सांगितले.
सुब्रतो रॉय यांनी शुक्रवारी सकाळी दोन पानांचे निवेदन जारी करून आपण फरारी नसल्याचे स्पष्ट केले तसेच सर्वोच्च न्यायालयाचे आदेश बिनशर्त पाळण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले. लखनऊ येथे त्यांना अटक झाल्यानंतर त्यांचा मुलगा सीमांतो रॉय याने दिल्लीत घाईघाईने पत्रकार परिषद बोलावली व सांगितले की, आपले वडील स्वेच्छेने पोलिसांच्या स्वाधीन झाले असून चौकशीत सहकार्य करीत आहेत. आपल्या वडिलांच्या अटकेचा परिणाम उद्योगावर होणार नाही. लाखो कर्मचारी असलेला ६८,००० कोटींचा हा उद्योग आहे.
सुब्रतो रॉय यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात अनुपस्थित राहिल्याबद्दल बिनशर्त माफी मागितली व वॉरंट मागे घेण्याची विनंती केली होती.
सुब्रतो रॉय यांनी न्यायालयास अशी कबुली दिली की, आपण सर्वोच्च न्यायालयात अनुपस्थित राहून चूक केली, न्यायालय आपल्याला एक दिवसाची सवलत देईल असे वाटत होते.