पतीच्या संपत्तीवर पत्नीच्या भावाचा कायदेशीररित्या कोणताच हक्क नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्याचे निकाल देताना म्हटले आहे. त्याचबरोबर महिलेच्या भावाला कुटुंबीयांचा हिस्साही मानले जात नाही. न्यायमुर्ती दीपक मिश्रा आणि आर. भानुमती यांच्या पीठाने हा निकाल दिला. दुर्गाप्रसाद नावाच्या एका व्यक्तीच्या खटल्याच्या सुनावणीप्रसंगी त्यांनी हा निकाल दिला. दुर्गाप्रसादने स्वत:ला आपल्या बहिणीच्या कुटुंबाचा हिस्सा असल्याचे सांगत त्यांच्या डेहराडून येथील एका संपत्तीवर आपला अधिकार असल्याचा दावा केला होता. त्यावर न्यायालयाने निकाल दिला. दुर्गाप्रसादने चार आठवड्यात त्या संपत्तीवरील आपला ताबा काढून घ्यावा अन्यथा न्यायालयाच्या कारवाईसाठी तयार राहावे असा सज्जड दमही दिला.
काय होते प्रकरण?
१९४० मध्ये हेमराम शर्मा नावाच्या एका व्यक्तीने डेहराडून येथे स्थावर मालमत्ता खरेदी केली होती. हेमराम शर्मा यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा बलदेव तेथे राहू लागला. बलदेव यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी ललिता या तिथे राहू लागल्या. ललिता यांचा २०१३मध्ये मृत्यू झाला. त्यांना कोणतेही अपत्य नव्हते. त्याशिवाय त्यांनी मृत्यूपत्रही लिहिले नव्हते. ललिता यांच्या मृत्यूनंतर त्यांचा भाऊ दुर्गाप्रसाद याने त्या घरावर आपला दावा केला. त्यांनी आपण ललिताच्या कुटुंबातील एक भाग असल्याचे आणि बहिण ललिताबरोबर आपण मेडिकलचा व्यवसायही करत होतो, असे सांगितले.
यावर न्यायालयाने यूपी अर्बन बिल्डिंग्ज (रेग्यूलेशन ऑफ लेटिंग, रेंट अँड इव्हिक्शन अॅक्ट, १९७२) याचा आधार घेतला. त्यानंतर ललिता यांचा भाऊ कुटुंबीयांचा वारसदार व हिस्साही नसल्याचे न्यायालयाने म्हटले.