सुब्रतो रॉय यांची कारागृहातून सुटका करून रॉय यांना त्यांच्या निवासस्थानी नजकैदेत ठेवण्यात यावे अशी विनंती सहारा उद्योगसमुहाकडून सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही विनंती फेटाळत सहारा उद्योगसमुहास दिलासा देण्यास नकार दर्शविला आहे. यावेळी सहारा उद्योगसमुहाकडून दाखल करण्यात आलेल्या विनंतीपत्रात सुब्रतो रॉय कारागृहात असल्यामुळे समुहाला पैसा उभारण्यात अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान सहारा उद्योगसमुहाची मालमत्ता विकण्यासाठी परदेशी गुंतवणूकदारांचा शोध सुरू असला तरी, कोणताही गुंतवणूकदार यासंदर्भात सुब्रतो रॉय यांच्याशी चर्चा करण्यासाठी कारागृहात येण्यास तयार नसल्याची माहिती सहारा उद्योगसमुहाचे वकील राम जेठमलानी यांनी न्यायालयाला दिली. सुब्रतो रॉय यांना ठेवण्यात आलेल्या तिहार कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैद्यांचा भरणा असल्यामुळे या ठिकाणी खूप गर्दी असते. त्यामुळे मालमत्तेसंदर्भातील चर्चेसाठी कोणताही इच्छुक गुंतवणूकदार अशा ठिकाणी येण्यास तयार होणार नसल्याचे राम जेठमलानी यांनी न्यायालयाला सांगितले. गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याच्या हेतूने सुब्रतो रॉय यांना कारागृहात ठेवण्यात आले असले तरी याच कारणामुळे सहारा उद्योगसमुहाला निधी उभारण्यात अडथळा येत असल्याचेसुद्धा यावेळी वकिलांकडून सांगण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supreme court turns down saharas plea to release subrata roy from tihar jail