Surat Bangkok Flight Viral Video : एअर इंडिया एक्स्प्रेसने शुक्रवारी गुजरातमधील सुरत येथून बँकॉकपर्यंतचे पहिले थेट विमान सुरू केले आहे. या विमानातील प्रवाशांनी त्यांच्या विमान प्रवासातील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर याची सर्वत्र चर्चा होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुरतहून बँकॉकला जाणाऱ्या पहिल्याच विमानात एक विचित्र घटना घडल्याचा प्रकार समोर आला आहे. या विमानातील प्रवाशांची अवघ्या चार तासांतच विमानात असलेला १.८ लाख रुपयांचा दारूचा साठा संपवला. एवढेच नाही तर विमानातील सर्व लोकप्रिय गुजराती स्नॅक्स, खमन आणि थेपल्यावर ताव मारला. दरम्यान, या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या विमानात ३०० प्रवासी होते, त्यांनी सुमारे १५ लिटर दारू आणि लोकप्रिय गुजराती स्नॅक्स संपवले. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दारूच्या रिकाम्या बाटल्या दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे की, “आजपासून सुरत ते बँकॉक विमानसेवा सुरू झाली आहे. विमानातील ३०० प्रवाशांनी ४ तासांच्या प्रवासात १.८ लाख रुपयांची १५ लिटर दारू प्यायली. प्रवाशांनी सर्व स्नॅक्सही संपवले.”

सोशल मीडियावरील प्रतिक्रिया

एक्सवर या घटनेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्याखाली युजर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. यावेळी एक युजर म्हणाला, “हे फक्त दारूबद्दल नाही तर हे फुकट दारूबद्दल आहे. कोणतीही गोष्ट फुकटात मिळते तेव्हा आपण भारतीय लोक सर्व नैतिकता विसरतो.”

आणखी एक युजर म्हणाला की, “लोकशाहीत दारूबंदी हा अन्यायकारक कायदा असून, हा कायदा भ्रष्टाचार, गुंडगिरीला जन्म देतो. लोकांना दारू न पिण्याचा सूफी सल्ला देणे हे सरकारचे काम नाही, हे काम समाजसुधारकांचे, धर्मगुरूंचे किंवा कुटुंबप्रमुखाचे आहे.”

गुजरातमध्ये १९६० पासून दारूबंदी

गुजरातमध्ये १९६० पासून दारूचे सेवन व विक्रीवर बंदी आहे. पण, यामुळे नागरिकांनी दारू पिणे किंवा विक्री करणे थांबवले नाही. गुजरात विधानसभेच्या २०२२ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, मागील दोन वर्षांमध्ये ३०० कोटींहून अधिक किमतीची दारू जप्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. अलीकडेच, गुजरात सरकारने गांधीनगरमधील गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (GIFT) मध्ये दारू पिण्यास परवानगी दिली आहे.

हे ही वाचा :  “तीनशे भारतीयांचे व्हॉट्सॲप क्रमांक….”, पेगाससवर अमेरिकन न्यायालयाच्या निकाल; काँग्रेसने डागली तोफ

सुरत-बँकॉक विमानातील या विचित्र घटनेबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी सोशल मीडियावर याबाबत खूप चर्चा होत आहे. या प्रकारामुळे अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत तर काही जणांनी हा गुजरातमधील दारूबंदीचा परिणाम असल्याचे म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surat bangkok flight runs dry mid air after passengers consume two lakh worth of liquor aam