सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे तपास सोपवण्याचा आदेश देत महाराष्ट्र पोलिसांना मोठा धक्का दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी हा अन्यायाविरुद्ध न्यायाचा विजय अस्लयाची प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे आपण प्रचंड आनंदी असल्याचं सांगत हा १३० कोटी जनतेच्या भावनांचा विजय असल्याचं ते म्हणाले आहेत.

सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटलं की, “न्यायालयाच्या निर्णयामुळे १३० कोटी जनतेच्या मनात सर्वोच्च न्यायालयाबद्दल असलेली आस्था अजून दृढ झाली आहे. लोकांचा लोकशाहीवरील विश्वास वाढला आहे. आता लोकांना सुशांत सिंह प्रकरणी न्याय मिळेल असा विश्वास वाटू लागला आहे”.

“ही संपूर्ण देशासाठी मोठी बातमी आहे. आमच्यावर अनेक आरोप केले जात होते. केस दाखल का केली अशी विचारणा होत होती. तपासासाठी अधिकाऱ्याला पाठवलं तर त्याला कैद्याप्रमाणे क्वारंटाइन करण्यात आलं. यावरुनच लोकांना काहीतरी गडबड असल्याचं वाटत होतं. आम्ही जे काही काम केलं ते कायदेशीर पद्धतीने केलं. सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे,” असं गुप्तेश्वर पांडे यांनी सांगितलं.

“मुंबई पोलिसांनी केलेला तपास अगदी चुकीचा आणि बेकायदेशीर होता. आम्ही करत असलेल्या तपासातून निकाल हाती येणारच. कारण ही फक्त एका व्यक्तीची, एका कुटुंबाची किंवा माझी वैयक्तिक लढाईनाही तर १३० कोटी जनता ज्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे त्यांची लढाई आहे,” असं गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटलं आहे. बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर भाष्य करण्याची रिया चक्रवर्तीची लायकी नाही असंही यावेळी गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटलं. बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच आज हे यश मिळालं असल्याचं त्यांनी सांगितलं.