Swiggy and Hotel Bill Comparison : कोयंबतूर येथील एका तरुणाने एकाच रेस्तराँमधील पदार्थांच्या ऑनलाइन (स्विगी) व ऑफलाइन किमती शेअर करत स्विगीच्या कारभारावर आक्षेप नोंदवला आहे. पुरावा म्हणून त्याने ऑनलाइन व ऑफलाइन बिलं शेअर केली आहेत. या तरुणाने म्हटलं आहे की “एका हॉटेलमध्ये जाऊन जेवल्यानंतर तेच पदार्थ स्विगीवरून ऑर्डर करण्यासाठी दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत”. तरुणाने एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर दोन्ही बिलांचा फोटो व तपशीलवार माहिती दिली आहे.
सुंदरजी (@SunderjiJB) असं या व्यक्तीचं असून तो म्हणाला की “हे रेस्तराँ माझ्या घरापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. मी जे पदार्थ तिथे जाऊन खाल्ले आहेत तेच पदार्थ स्विगीवरून मागवताना दुप्पट पैसे द्यावे लागत आहेत. आपल्याला प्रवास करून रेस्तराँमध्ये जायचं नसेल तर त्याऐवजी हे लोक दुप्पट पैसे घेणार का? ही आमच्या सोयीची खरी किंमत आहे का?”
तरुणाकडून दोन्ही बिलांची तुलना
सुंदरजीने रेस्तराँमध्ये जाऊन नऊ पराठे – १८० रुपये, एक चिकन ६५ – १५० रुपये, चिकन लॉलीपॉप – २०० रुपये, दोन चिकन बिर्याणी – २८० रुपये ऑर्डर केली. यासाठी त्याने ८१० रुपये बिल भरलं. मात्र, हेच पदार्थ स्विगीवरून ऑर्डर करण्यासाठी त्याला ८० टक्के अधिक पैसे द्यावे लागत असल्याचं त्याने सांगितलं. स्विगीवरून हे पदार्थ ऑर्डर करण्यासाठी आठ पराठे – ३५० रुपये, एक चिकन ६५ – २४० रुपये, चिकन लॉलीपॉप ३२० रुपये, दोन चिकन बिर्याणी – ४६० रुपये, असे सगळे मिळून १४७३ रुपये बिल दाखवण्यात आलं आहे.
पुढच्या वेळी पोर्टवरून जेवण मागवेन : सुंदर
हे बिल शेअर करत सुंदरजीने म्हटलं आहे की “८० टक्के महागाई जरा जास्तच आहे असं वाटत नाही का? पुढील वेळेस मी हेच पदार्थ पोर्टवरून मागवेन. त्यासाठी मला केवळ अधिकचे १०० रुपये द्यावे लागतील.”
नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया
सुंदरजीच्या या पोस्टवर वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत. एका युजरने म्हटलं आहे की सर्वसाधारणपणे रेस्तराँमधील पदार्थांच्या मूळ किमतीपेक्षा स्विगी किंवा झोमाटोवर ३० टक्के अधिक पैसे द्यावे लागगतात. परंतु, इथे ८० टक्के अधिक किंमत वसूल केली जात आहे. हे जरा जास्तच आहे.
तर, दुसऱ्या एका युजरने सुंदरजीलाच सुनावलं आहे. तो म्हणाला, “तुम्ही असे वागताय जसं की या किमती तुमच्यावर लादल्या गेल्या आहेत. हा एक मुक्त बाजार आहे. अॅप व पदार्थ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या बदल्यात कंपनीली काही पैसे कमवायचे आहेत. ते त्यांचा हिस्सा घेणारच.” दरम्यान, आरुषी नावाच्या एका तरुणीने म्हटलं आहे की “बऱ्याचदा या किमती रेस्तराँने ठरवलेलया असतात. स्विगी स्वतःहून या किमती ठरवत नाही.”