पीटीआय, नवी दिल्ली
मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणा याने मुंबईसारख्याच हल्ल्याचे नियोजन देशाच्या इतर शहरांत केले असण्याची शक्यता आहे, असा संशय राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दिल्ली न्यायालयात व्यक्त केला. ‘एनआयए’च्या युक्तिवादानंतर दिल्ली न्यायालयाने राणाला १८ दिवसांची ‘एनआयए’ कोठडी सुनावली.
विशेष न्यायाधीश चंदेर जित सिंग यांच्यासमोर ‘एनआयए’ने आपले म्हणणे मांडले. दर २४ तासांनी राणाची वैद्याकीय तपासणी करावी आणि राणाला त्याच्या वकिलांना एक दिवसाआड भेटू द्यावे, असे निर्देश न्यायालयाने ‘एनआयए’ला दिले. ‘एनआयए’ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राणाला त्याच्या वकिलांना भेटता येईल.
मुंबईवरील हल्ल्याच्या कटाची पूर्ण व्याप्ती समोर यावी, यासाठी राणाची कोठडी गरजेची आहे. तसेच, १७ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचे पूर्ण चित्र उभे राहावे, यासाठी त्याला संबंधित सर्व ठिकाणी घेऊन जाणे गरजेचे आहे. कटाचा पूर्ण उलगडा व्हावा आणि त्याची सखोल चौकशी व्हावी, यासाठी त्याची दीर्घ काळ कोठडी गरजेची असल्याचे एनआयएने नमूद केले. मुंबईवरील हल्ल्यात जे डावपेच वापरले, त्याचा वापर देशातील इतर शहरांत हल्ल्यासाठीही करण्याचे त्याचे नियोजन होते, असा आम्हाला संशय आहे.’
चोख सुरक्षा व्यवस्था
राष्ट्रीय तपास संस्थेच्या मुख्यालयाबाहेर बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणा याला न्यायालयाने १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावल्यानंतर त्याला येथे ठेवले जाणार आहे.
मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा जगाला हादरवून टाकणारा होता. या प्रकरणातील दोषींना शिक्षा देण्यासाठी भारताच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना सहकार्य केले जाईल. – टॅमी ब्रूस, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या