गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलात सहकारी पत्रकार महिलेशी लैंगिक गैरवर्तन केल्याप्रकरणी आरोपी असलेले ‘तहलका’चे संपादक तरुण तेजपाल यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. गुन्हे अन्वेषण शाखेने त्यांचे जाबजबाब सुरू केले आहेत. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शमा जोशी यांनी तेजपाल यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी दिली, मात्र पोलिसांनी १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती.
सरकारी वकील फ्रान्सिस तवेरा यांनी सांगितले, की तेजपाल यांनी केलेला गुन्हा पाहता त्यांचे जाबजबाब घेण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची गरज आहे. तेजपाल यांना शनिवारी रात्री नऊ वाजता अटक करण्यात आली. तत्पूर्वी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश अनुजा प्रभुदेसाई यांनी फेटाळला.
 शनिवारची रात्र तेजपाल यांना तीन गुन्हेगारांसह पोलीस कोठडीत काढावी लागली. त्यातील दोघे खुनाच्या गुन्हय़ातील आरोपी आहेत. मध्यरात्री बारा वाजता त्यांची गोवा वैद्यकीय महाविद्यालयात अनिवार्य वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांनी पत्रकारांशी बोलण्यास नकार दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तेहलका बुडणार?
*‘तेहलका’ची मालकी असलेल्या अनंत मिडीया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर संपत्ती कमी आणि देणी जास्त अशी अवस्था आली आहे.
* या कंपनीमध्ये अंतर्गत हिशेब तपासनीस आणि लेखा परीक्षकांचा अभाव, सेवा कराचा भरणा न करणे अशा अनियमितता कंपनी व्यवहार मंत्रालयास आढळल्या आहेत.
* बाह्य़ लेखापरिक्षकांनीही कंपनीच्या आर्थिक व्यवहारांवर ‘लाल शेरे’ मारले आहेत. याबद्दल अधिकृतपणे कोणतेही भाष्य करण्यास मंत्रालयाने नकार दिला तरी चौकशीचा विचार होत आहे.
*  कंपनीची १३ कोटी रुपयांची देणी आहेत. २०११-१२ या वर्षांअखेर थकीत सेवाकर आणि अन्य कराच्या रकमेने २६ लाखांचा आकडा ओलांडला आहे.

जन्मठेपही होऊ शकते..
विनयभंगासाठी लावलेल्या ३५४ (अ) या भादंवि कलमाखाली ७ वर्षांपर्यंत कैद तर बलात्कारासाठी लावलेल्या ३७६ (२) (क) या नव्या कलमाखाली कमीतकमी १0 वर्षे आणि जास्तीतजास्त जन्मठेपेची शिक्षा तेजपाल यांना होऊ शकते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tarun tejpal remanded in goa police custody for 6 days