कर्नाटकातील काही शाळांमधील विद्यार्थ्यांना सोमवारी सकाळी कॅम्पसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांचे हिजाब काढण्याचे निर्देश देण्यात आले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शैक्षणिक संस्था पुन्हा उघडू शकतात, परंतु  शिक्षण संस्थांमध्ये कोणत्याही धार्मिक कपड्यांना परवानगी दिली जाणार नाही. विद्यार्थ्यांना केवळ शाळेच्या गणवेशामधेच प्रवेश करता येईल.

एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक शिक्षक मंड्या जिल्ह्यातील सरकारी शाळेच्या गेटवर विद्यार्थ्यांना हिजाब घालून थांबवताना आणि त्यांना “ते काढा, ते काढून टाका” असे आदेश देत असल्याचे दाखवले आहे.

व्हिडीओमध्ये काही पालक त्यांच्या मुलींना शाळेत प्रवेश करण्यापासून रोखल्यामुळे वाद घालताना दिसत आहेत. दरम्यान, थोडावेळ झालेल्या वादानंतर मुलींनी हिजाब काढला आणि करोना प्रोटोकॉलनुसार फक्त फेस मास्क घातला आणि शाळेत प्रवेश केला.

दरम्यान, दोन मुलींचा पिता असलेला एक माणूस थोडा वेळ थांबला. शिक्षकांनी खूप वेळ चर्चा केल्यावर तो शांत झाला आणि त्याने मुलींना हिजाब काढून शाळेत जाण्यास सांगितले.

एएनआयने एका पालकाचा हवाला देत म्हटले आहे, “मुली वर्गात पोहोचेपर्यंत हिजाब घालण्याची परवानगी देण्याची विनंती आम्ही करत आहोत. वर्गात गेल्यानंतर हिजाब काढल्यास आम्हाला हरकत नाही, पण ते प्रवेश देत नाहीत,” असं ते म्हणाले.