केंद्र सरकार मंगळवारी वेगळ्या तेलंगणाची निर्मिती करण्याचे विधेयक लोकसभेत सादर करणार असल्याने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी राजीनामा देण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यावरून रेड्डी कॉंग्रेसला रामराम ठोकण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेड्डी मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास आंध्र प्रदेशचे राज्यपाल ई. एस. एल. नरसिंहन यांना भेटणार असून, त्याचवेळी ते त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील. रेड्डी यांचा वेगळ्या तेलंगणा राज्यनिर्मितीला विरोध आहे. यामुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून त्यांनी थांबा आणि वाट पाहा धोरण स्वीकारले होते. मात्र, मंगळवारी आंध्र प्रदेश पुनर्रचना विधेयक २०१४ लोकसभेत मंजूर होण्याची शक्यता असल्याने रेड्डी लगेचच राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.
रेड्डी यांच्या मंत्रिमंडळातील केवळ ३ ते ४ मंत्री आणि काही आमदारांचा रेड्डी यांच्या संभाव्य राजीनाम्याला पाठिंबा आहे. मात्र, तरीही राजीनामा देण्यावर रेड्डी ठाम आहेत, असे सूत्रांनी सांगितले.