पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी फ्रान्सचे नवे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी हवामान बदल, दहशतवादाचा मुकाबला यासह विविध आंतरराष्ट्रीय आणि परस्पर हिताच्या प्रश्नांवर व्यापक चर्चा केली.
फ्रान्सच्या अध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या एलिसी पॅलेसमध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाली. मोदी यांनी मॅक्रॉन यांची भेट घेतली आणि मैत्रीचा नवा अध्याय सुरू झाला, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बागले यांनी ट्वीट केले.
मोदी यांचे रशियाहून येथे आगमन झाले. रशियामध्ये मोदी यांनी अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषदेलाही हजेरी लावली. त्यापूर्वी मोदी यांनी जर्मनी आणि स्पेनचा दौरा करून तेथील उच्चपदस्थ नेत्यांशीही चर्चा केली.
संयुक्त राष्ट्र संघ सुरक्षा परिषद सुधारणा आणि सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व, हवामान बदल, दहशतवाद प्रतिबंध यासह विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणार असल्याचे मोदींनी फ्रान्स भेटीपूर्वी स्पष्ट केले. फ्रान्स हा भारताचा नववा सर्वात मोठा गुंतवणूकदार भागीदार देश आहे. संरक्षण, अंतराळ, आण्विक व अपांरपरिक ऊर्जा, शहरविकास आणि रेल्वे या क्षेत्रातीलही महत्त्वाचा भागीदार देश आहे.