Jagannath Temple Terror Alert 2025 : ओडिसामधील पुरी येथील जगन्नाथ मंदिर हे प्रसिद्ध मंदिरापैकी एक आहे. मात्र, हे जगन्नाथ मंदिर उडवण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुरीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या धमकीमुळे येथील भाविकांमध्येही भितीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेनंतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. तसेच मंदिराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी सुरू करण्यात आली आहे.

जगन्नाथ मंदिराच्या बाहेर परिक्रमा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेरिटेज कॉरिडॉरजवळील दुसऱ्या एका मंदिराच्या भिंतीवर ओडिया आणि इंग्रजी अशा दोन भाषेत भिंतीवर एक संदेश लिहित धमकी देण्यात आली आहे. भिंतीवर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे की, “जगन्नाथ मंदिरावर दहशतवादी हल्ला करतील आणि ते नष्ट करतील. तसेच कॉल करा, अन्यथा सर्वकाही उद्ध्वस्त होईल”, असं त्या ठिकाणी लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे.

मंदिराच्या भिंतीवर काही फोन नंबर देखील लिहिलेले असल्याचं आढळून आलं. तसेच त्या ठिकाणी पंतप्रधान मोदी असे शब्दही लिहिले असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे या संपूर्ण घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ पुढील तपास सुरू केला आहे. या बरोबरच हेरिटेज कॉरिडॉरच्या परिसरातील काही सजावटीचे दिवे देखील अचानक खराब झाल्याचं आढळून आलं आहे. सजावटीचे दिवे अचानक खराब कसे झाले? याबाबतही आता सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.

दरम्यान, जगन्नाथ मंदिर परिसरात असंख्य सीसीटीव्ही कॅमेरे आणि सतत पोलिसांच्या देखरेखीखाली असलेल्या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे भाविकांकडून अनेक वेगवेगळे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. त्यामुळे पोलिसांबाबत आणि मंदिरातील सुरक्षा व्यवस्थेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या संदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

एका स्थानिक भाविकाने सांगितलं की, “अलीकडेच झालेल्या एका गंभीर सुरक्षेच्या त्रुटीत काही अज्ञात व्यक्ती मंदिराच्या बाहेरील भिंतीवर चढून अनधिकृत प्रवेश केला. अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. यातच आता या धमकीच्या घटनेमुळे आमची चिंता वाढली आहे. खरं तर हे मंदिर सतत देखरेखीखाली असूनही अशा ठिकाणी अशा प्रकारचे धमकी देणारे संदेश लिहिले जाऊ शकतात हे अस्वस्थ करणारं आहे.”

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, “भिंतीवर अशा प्रकारे धमकीचा संदेश लिहिलेल्या घटनेनंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. अशा प्रकारचा संदेश गैरकृत्य म्हणून लिहिले गेले असल्याचाही संशय आहे.आम्ही आता कॅमेऱ्यांमधील फुटेजची तपासणी करत आहोत. आम्ही हे प्रकरण खूप गांभीर्याने घेत आहोत. मंदिर आणि भाविकांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.”