काश्मीरमधील अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वाहनावर गोळीबार केला आहे. या गोळीबारात पाच जवान जखमी झाले आहेत. या जवानांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या अनंतनागमध्ये लष्कराची कारवाई सुरु आहे. सकाळी साडेआठच्या सुमारास अनंतनागमधील लाझीबल येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ९६ व्या बटालियनवर गोळीबार केला.

दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचे पाच जवान जखमी झाले. यातील तिघांना थेट गोळीबारामुळे इजा झाली असून इतर दोनजण वाहनाची काच फुटल्याने जखमी झाले आहेत. जखमी जवानांवर सध्या उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याआधी २ ऑक्टोबरला जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी श्रीनगर विमानतळाजवळील सीमा सुरक्षा दलाच्या तळावर हल्ला केला होता. श्रीनगर विमानतळ आणि त्याजवळील परिसर अतिशय संवेदनशील समजला जातो. या भागात हल्ला झाल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. पहाटेच्या सुमारास हा हल्ला झाल्यानंतर दुपारपर्यंत लष्कराने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.