थायलंडमध्ये रविवारी निवडणुका झाल्या त्यात निदर्शकांनी मतदान केंद्रे बंद पाडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला झालेल्या हिंसाचारात सातजण जखमी झाले. थायलंडमध्ये अलीकडेच पंतप्रधान श्रीमती यिंगलक शिनावात्रा यांनी मध्यावधी निवडणुका जाहीर केल्या असून विरोधी पक्षांना त्याच परत सत्तेवर येण्याची भीती वाटत असून त्यांनी या निवडणुकीला विरोध केला आहे. बँकॉकमध्ये ६६०० पैकी किमान ४०० मतदान केंद्रे बंद पाडण्यात आली, निदर्शकांशी सुरक्षा दलांची चकमक झाली. काही मतदार घाबरून गेले. काही ठिकाणी निदर्शकांनी मतदान केंद्रांभोवतीच अडथळे उभे केले होते. काही प्रकरणात निदर्शकांनी मतपत्रिकाही वाटू दिल्या नाहीत. मतदान साहित्य केंद्रांपर्यंत पोहोचू दिले नाही. निवडणूक आयोगाने असे म्हटले आहे की, दक्षिणेकडील अनेक मतदान केंद्रे ही विरोधकांच्या ताब्यात सापडली व त्यामुळे असेच प्रश्न निर्माण झाले. रविवारच्या निवडणुकीतून काहीही ठोस निष्पन्न होणार नाही असा विरोधकांचा विश्वास असून काही ठिकाणी उमेदवारांची नोंदणी थांबवण्याचा प्रयत्नही निदर्शकांनी केला होता. गेले काही महिने थायलंडमध्ये पेचप्रसंग सुरू असून ज्या ठिकाणी मतदान होऊ शकले नाही तिथे पोटनिवडणुका झाल्या त्यामुळे पेचप्रसंग कायम राहणार आहे. सरकारी दले व निदर्शक यांच्यात शनिवारीच धुमश्चक्री झाली होती. शनिवारी जखमी झालेल्यात एका स्थानिक वृत्तपत्राचा प्रतिनिधी तसेच छायाचित्रपत्रकार जेम्स नॅशवे यांचा समावेश आहे. यिंगलक सरकारने मोठा भ्रष्टाचार केला असून त्यांना अधिकारपदावर राहता येणार नाही, असा इशारा विरोधकांनी दिल्यानंतर यिंगलक यांनी मध्यावधी निवडणुका जाहीर केल्या होत्या. यिंगलक यांनी वार्ताहरांना सांगितले की, आजचा दिवस महत्त्वाचा असून थायलंडच्या लोकांनी बाहेर पडून लोकशाही व्यवस्था राखण्यासाठी मदत करावी. बँकॉकच्या अनेक भागात मतदान सुरळीत नव्हते. दिन दाएंग यांची निदर्शकांशी चकमक झाली व त्यांनी एकमेकांवर बाटल्या फेकल्या. एका निदर्शकाने संतप्त मतदारावर गोळी झाडली. सुदैवाने तो वाचला.