दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.  दिल्लीकरांना आता २०० युनिट पर्यंतच्या वीज वापरासाठी वीज बिल  द्यावे लागणार नाही. याबाबत त्यांनी पत्रकारपरिषदेत माहिती देतांना सांगितले की, जर कोणी केवळ २०० युनिट पर्यंतच विजेचा वापर करत असले तर त्याला वीज बील द्यावे लागणार नाही. तसेच, २०१ ते ४०० युनिट पर्यंत विजेच्या वापरावर ५० टक्के सबसिडी दिली जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कमी वीज वापरणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

तसेच, मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, दिल्लीत २०० युनिट पर्यंत वीज वापरावर कालपर्यंत लोकांना ६२२ रूपये द्यावे लागत होते. मात्र, आता ही वीज मोफत दिली जाणार आहे. तर २५० युनिट वापरावर ८०० रूपये बील येत होते त्यासाठी आता केवळ २५२ रूपये द्यावे लागणार आहेत. ३०० युनिट पर्यंत ९७१ रूपये बील येत होते ते आता ५२६ रूपये येईल व ४०० युनिटच्या वीज वापरासाठी १३२० रूपयांऐवजी आता १०७५ रूपये द्यावे लागणार आहेत.

आमच्या सरकारच्या काळात दिल्लीत वीज स्वस्त झाली. या अगोदर वीज कंपन्यांची आर्थिक परिस्थिती खराब होती, दिल्लीत ब्लॅक आउटची परिस्थिती निर्माण झाली होती. वीज कंपन्या कंगाल झाल्या होत्या. वीज बिल जास्त येत होते. वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाणही वाढले होते, लोक दरवर्षी इंनवर्टर आणि जनरेटरची खरेदी करत होते. मात्र आमच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे ही परिस्थिती बदलली. अन्य राज्यांमध्ये वीज बिलाच्या दरात वाढ होत आहे, मात्र आज दिल्लीत दर कमी होत आहेत. वीज कंपन्यांची देखील परिस्थिती सुधारली आहे.