मुलांप्रमाणेच मुलींनाही, शिक्षण, आरोग्य आणि पुढे जाण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन समान संधी देणारी कुटुंबे आणि समाजच सुखी राष्ट्र घडवू शकते. महिलांना न्याय देण्यासाठी सरकार कायदा करू शकते धोरण आखू शकते मात्र, हे कायदे तेव्हाच प्रभावी ठरतील जेव्हा कुटुंब आणि समाज आपल्या मुलींचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकेल. देशाच्या परिवर्तनासाठी या हाकेकडे आपण लक्ष द्यायलाच हवे, असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ६९व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला देशवासीयांना संबोधित करताना केले.

राष्ट्रपती म्हणाले, आत्मविश्वासपूर्ण आणि भविष्याकडे पाहणाऱ्या युवकांमुळेच आत्मविश्वासपूर्ण आणि प्रगतीशील राष्ट्र घडते. आपल्या लोकसंख्येपैकी ६० % पेक्षा अधिक लोकसंख्या ३५ पेक्षा कमी वयोगटातली आहे. आपल्या आशा-आकांक्षा त्यांच्यावर एकवटल्या आहेत. साक्षरतेचा प्रसार करण्यात आपण प्रगती केली आहे, आता आपण आपल्या शिक्षण आणि ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत. आपल्या शिक्षण पद्धतीत सुधारणा, तिचा स्तर उंचावणे आणि कक्षा रूंदावणे आणि एकविसाव्या शतकाच्या डिजिटल अर्थव्यवस्था, जिनोमिक्स, रोबोटिक्स आणि स्वयंचलन या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी ही शिक्षण पद्धती सक्षम करणे हा आपला उद्देश असला पाहिजे.

देशात सध्या सुरु असलेल्या जातीपतीच्या आणि प्रांतवादाच्या हिंसक खेळामुळे होत असलेल्या देशाच्या हानीकडे लक्ष वेधताना राष्ट्रपती म्हणाले,  खेड्यात अथवा शहरात, नागरी कर्तव्य आणि जबाबदारी याचं भान असणाऱ्या नागरिकांमुळेच, सजग राष्ट्र निर्माण होते. आपण आपल्या शेजाऱ्याच्या वैयक्तिक बाबी आणि अधिकारांचा आदर राखतो. सण-उत्सव साजरे करताना, विरोध प्रदर्शित करताना किंवा  कोणत्याही वेळी आपण शेजाऱ्याची गैरसोय करत नाही. एखाद्याच्या दृष्टीकोनाशी किंवा इतिहासातल्या संदर्भाशी, दुसऱ्याच्या वैयक्तिक भावनांचा उपहास न करताही आपण असहमत असू शकतो, यालाच बंधुत्व म्हणतात.

२६ जानेवारी १९५० ला भारत, प्रजासत्ताक राष्ट्र बनले. राष्ट्र निर्माण प्रक्रियेतला हा दुसरा महत्वाचा टप्पा होता. स्वातंत्र्य प्राप्तीला दोन वर्ष होऊन गेली होती. राज्यघटना निर्माण करून तिचा अंगीकार, आणि प्रजासत्ताक भारताच्या निर्मितीबरोबरच आपण खऱ्या अर्थाने, नागरिक, मग तो कोणत्याही धर्माचा, कोणत्याही प्रदेशाचा किंवा कोणत्याही समुदायाचा असो, सर्व नागरिक एकसमान हे तत्व साध्य केलं. समतेच्या या आदर्शाने आपल्या स्वातंत्र्याला पूर्णत्व प्रदान केलं. आणखी एक तिसरा आदर्शही होता, जो आपल्या लोकशाही निर्मितीचा सामुहिक प्रयत्न आणि आपल्या स्वप्नातल्या भारतात प्रतीत होता, तो म्हणजे बंधुता. अशा शब्दांत राष्ट्रपतींनी देशवासीयांना बंधुभावने राहण्याचे आवाहन केले.

आपल्या राष्ट्रसंबोधनाच्या सुरुवातीला राष्ट्रपतींनी ६९ व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. आपल्या देशाप्रती आदर बाळगत आपल्या सार्वभौमत्वाचा उत्सव साजरा करण्याचा हा दिवस असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देऊन प्रजासत्ताक राष्ट्र निर्माण करण्यासाठी अगणित कष्ट झेलत, प्राणांचे बलिदान देणाऱ्या लाखो स्वातंत्र्य सैनिकांचे असंख्य प्रयास आणि बलिदानाचे कृतज्ञतेने स्मरण करण्याचा हा दिवस असल्याचे सांगत आपल्या प्रजासत्ताक मूल्यांप्रती नतमस्तक होण्याचा हा दिवस असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.