आई शप्पथ… सापडला पृथ्वीचा ‘दुसरा चंद्र’; हा पाहा फोटो

अमेरिकन संशोधकांनी लावला शोध

दुसरा चंद्र (फोटो सौजन्य: २४ न्यूज)

पृथ्वीला चंद्र किती आहेत असा प्रश्न विचारल्यास अगदी लहान पोरगाही एक असं उत्तर देईल. मात्र लवकरच या प्रश्नाचे उत्तर दोन असं द्यावं लागणार आहे. कारण पृथ्वीचा दुसरा चंद्र शोधल्याचा दावा अमेरिकेतील संशोधकांनी केला आहे.

संशोधकांनी पृथ्वीच्या दुसऱ्या चंद्राला २०२० सीडी थ्री असं नाव दिलं आहे. मागील तीन वर्षांपासून हा अगदी लहानश्या आकाराचा चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत आहेत. अमेरिकेतील अॅरेझॉना येथील कॅटालीना स्काय सर्व्हे येथील संशोधकांनी या चंद्राचा शोध लावला आहे. १९ फेब्रुवारी रोजी येथील संशोधकांना हा चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना दिसला. याआधीही संशोधकांना हा चंद्र सहा वेळा दिसला होता. त्यामुळे हा पृथ्वीचा मीनी मून असण्यावर संशोधकांनी शिक्कामोर्तब केला आहे. हा चंद्र १.९ मीटर लांब आणि ३.५ मीटर रुंद आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर तो एका लहान गाडीच्या आकाराचा आहे.

“पृथ्वीला एक तात्पुरता चंद्र मिळाला आहे. त्याचं नाव आहे ‘२०२० सीडी थ्री’. १५ फेब्रुवारीच्या रात्री मी कॅटालीना स्काय सर्व्हे येथे माझ्याबरोबर काम करणाऱ्या टेडी प्रुयेनीसोबत या चंद्राचा शोध लावला,” असं ट्विट खगोल अभ्यासक असणाऱ्या कॅस्पर विर्झेकोस याने केलं आहे. “सध्या या चंद्राच्या प्रदक्षिणा घालण्याच्या मार्गावरुन हा पृथ्वीभोवती फिरत असल्याचे दिसते. सुर्यामुळे या पृथ्वीभोवती फिरणाऱ्या मिनी मूनवर काही परिणाम झाल्याचे अद्याप निदर्शनास आलेले नाही. तसेच या खगोलीय वस्तुचा इतर मोठ्या कृत्रिम वस्तुशी (सॅटेलाइट वगैरे) संबंध असल्यासंदर्भातही काही माहिती मिळाली नाही,” असं द इंटरनॅशनल अॅस्ट्रोनॉमिकल युनियच्या मीरर प्लॅनेट सेंटरने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

या नव्या चंद्राची परिक्रमण कक्षा ठरलेली नसून तो कधी पृथ्वीच्या जवळ असतो तर कधी लांब असंही संशोधकांनी सांगितलं आहे. याआधी २००६ साली ‘आरएच वन २०’ ही छोटी खगोलीय वस्तू पृथ्वी भोवती फिरत होती. सप्टेंबर २००६ ते जून २००७ पर्यंत पृथ्वीभोवती भ्रमण केल्यानंतर ही वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून बाहेर गेली. ‘आरएच वन २०’ प्रमाणे ‘२०२० सीडी थ्री’ पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून निघून जाईल असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The earth has a second moon and no one noticed all this while scsg

Next Story
ओवेसी, वारिस पठाण यांचं चिथावणीखोर भाषण; उच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी