आसाममधील पूरस्थिती पुन्हा गंभीर

आसाममधील पूरस्थिती शुक्रवारी पुन्हा गंभीर झाली. गेल्या २४ तासांत २९ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना पुराचा फटका बसला आहे.

dv assam
आसाममधील पूरस्थिती पुन्हा गंभीर

गुवाहाटी : आसाममधील पूरस्थिती शुक्रवारी पुन्हा गंभीर झाली. गेल्या २४ तासांत २९ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. कच्छर जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या सिलचरचा बहुतांश भाग पुराने बाधित झाला आहे. आसाम राज्य पूर व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या १५९ वर पोहोचली आहे. ३६ जण बेपत्ता आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे एक आंतर-मंत्रालयीन पथक आसाममध्ये पोहोचले असून, दोन दिवस ते पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गेल्या दहा दिवसांत तिसऱ्यांदा बराक खोऱ्याला भेट दिली. करीमगंज जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा त्यांनी घेतला. सुभाष हायस्कूल कालीबारी आणि गोपिकानगर येथील मदत शिबिरांना त्यांनी भेट दिली.

 मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी दोनदा सिलचरला भेट देऊन पाण्याखाली गेलेल्या शहराचे हवाई सर्वेक्षण केले होते. मेहेरपूर, विवेकानंद रोड, दास कॉलनी, अंबिकापट्टी, चर्च रोड, चंडीचरण रोड, बिलपार, पब्लिक स्कूल रोड, सुभाष नगर आणि एनएस अव्हेन्यूसह सिलचरमधील अनेक भागांत पूर आला आहे.

उपायुक्त कीर्ती जल्ली यांनी सांगितले, की बेथुकुंडी येथील फुटलेल्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. कच्छर जिल्ह्यातील कटीगोरा महसूल विभागातील बरजुरी येथील खराब झालेल्या धरणाच्या दुरुस्तीचे कामही सुरू आहे. जलजन्य आजारांना आळा घालण्यासाठी आरोग्य विभागामार्फत महापालिकेच्या सर्व २८ प्रभागांत वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून, बाधितांना पिण्याचे पाणी व अन्न पुरविण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

आसाममध्ये पोलीस ठाण्याचे २ मजले गेले वाहून, पाहा व्हिडीओ –

राज्यातील ७५ महसूल मंडलांतर्गत दोन हजार ६०८ गावे पुरामुळे प्रभावित झाली आहेत, तर तीन लाख पाच हजार ५६५ जणांनी मदत छावण्यांत आश्रय घेतला आहे. तात्पुरत्या केंद्रांमध्ये आश्रय न घेतलेल्या पूरग्रस्तांना ३५५ पुरवठा केंद्रांमधून मदत साहित्याचे वाटप करण्यात आले. सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांपैकी, कच्छर जिल्ह्यात १४ लाख ३१ हजार ६५२, नागावमध्ये पाच लाख १९ हजार ४६३ व बारपेटा जिल्ह्यात चार लाख ५०२ नागरिक पूरग्रस्त आहेत.

७६ हजार ११५ हेक्टर शेती पाण्याखाली

पुरामुळे बिस्वनाथ आणि उदलगुरी येथे दोन बंधाऱ्यांना तडे गेले असून, २२१ रस्ते, पाच पूल आणि ५५७ घरांचे नुकसान झाले आहे. ७६ हजार ११५ हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे, तर ५१ जनावरे वाहून गेली आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The situation assam critical again citizens disappeared ysh

Next Story
पाकिस्तानच्या ताब्यात ६८२ भारतीय नागरिक
फोटो गॅलरी