प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांनी सध्या युनायटेड किंगडममधील न्यायालयात चिनी बँकांच्या सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान आपण एक साधारण आयुष्य जगत असल्याचं म्हटलं आहे. तसंच आपल्याकडे असलेले दागिने विकून आपण आपल्या वकिलांची फी भरत असल्याचंही त्यांनी न्यायालयाला सांगितलं आहे. यावरून आता ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी निशाणा साधला आहे.

“अनिल अंबानी यांनी युकेमधील न्यायालयात, वकिलांची फी भरण्यासाठी पत्नीचे दागिने विकले असून आता आपल्याकडे काहीही नाही, केवळ एक छोटी कार आहे अशी माहिती दिली. ही तीच व्यक्ती आहे ज्यांना मोदींनी ३० हजार कोटींचं राफेलचं ऑफसेट कंत्राट दिलं”.असं प्रशांत भूषण यांनी ट्विट केलं आहे.

“यावर्षी जानेवारी ते जून या कालावधीदरम्यान आपण ९.९ कोटी रूपयांच्या सोन्याचे दागिने विकले. आता आपल्याकडे कोणतंही महागडं सामान शिल्लक नाही,” असं अनिल अंबानी यांनी न्यायालयाला सांगितलं आहे. दरम्यान, यावेळी न्यायालयानं त्यांना त्यांच्याकडे असलेल्या लग्झरी गाड्यांबद्दलही प्रश्न केला असता, “या सर्व माध्यमांमधून अफवा पसरवल्या जात आहेत. माझ्याकडे कधीही रोल्स रॉयस नव्हती. मी सध्या केवळ एकाच गाडीचा वापर करत आहे,” असंही अंबानी म्हणाले. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आणखी वाचा- दागिने विकून भरतोय वकिलांची फी; न्यायालयासमोर अनिल अंबानींचा दावा

२२ मे २०२० रोजी यूके उच्च न्यायालयानं अनिल अंबानींना १२ जून २०२० पर्यंत चीनच्या तीन बँकांचे ७१,६९,१७,६८१ डॉलर्स (जवळपास ५ हजार २८१ कोटी रूपये) कर्जाची रक्कम आणि ५० हजार पौंड्स ( जवळपास ७ कोटी रूपये) कायदेशीर प्रक्रियेच्या खर्चाच्या रकमेपोटी भरण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर १५ जून रोजी इंडस्ट्रिअल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायनाच्या नेतृत्वाखाली चिनी बँकांनी अनिल अंबानी यांच्या संपत्तीची माहिती देण्याची मागणी केली.