UK Crime Against Sikh : ब्रिटनमध्ये दोन वृद्ध शीख व्यक्तींना काही तरुणांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडीओनंतर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच या हल्ल्याच्या घटनेनंतर वंशवादाचा चेहरा समोर आला आहे. ब्रिटनमधील वॉल्व्हरहॅम्प्टन येथील रेल्वे स्थानकासमोर १५ ऑगस्ट रोजी ही घटना घडली.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दोन वृद्ध शीख व्यक्तींवर दिवसाढवळ्या भर रस्त्यावर हल्ला होत असल्याचं दिसत आहे. यातील एक वृद्ध व्यक्ती पगडीशिवाय जमिनीवर पडलेला दिसत आहे. तसेच दुसऱ्या एका वृद्ध व्यक्तीला काही तरुण मारहाण करताना दिसत आहेत. या मारहाणीच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आलं आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
बीबीसीच्या एका वृत्तानुसार, ब्रिटिश ट्रान्सपोर्ट पोलिसांनी या घटनेबाबत म्हटलं की, ऑनलाइन समोर आलेल्या हल्ल्याच्या कथित व्हिडीओची माहिती पोलिसांना मिळालेली आहे. ज्यामध्ये दोन पीडितांवर हल्ला होत असल्याचं दिसत आहे. तसेच संबंधित व्हिडीओमध्ये पीडितांपैकी एकाला जमिनीवर पाडलेले दिसत आहे. तसेच त्याची पगडी जमिनीवर पडल्याचं दिसत आहे. तसेच दुसऱ्या एका वृद्ध शीख व्यक्तीलाही मारहाण होत असल्याचं दिसत आहे.
तसेच या घटनेचं चित्रीकरण करणारी एक महिला हल्लेखोरांना ओरडत असल्याचं ऐकायला येत आहे. तसेच या दोन पुरुषांना या गोऱ्या पुरुषांनी मारहाण केली असल्याचं ती महिला त्या व्हिडीओत सांगत आहे. त्यानंतर हल्लेखोरांना तुम्ही काय करत आहात? असं ओरडून विचारत आहे. या घटनेतील पीडितांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या घटनेत अटक करण्यात आलेल्या आरोपींना जामीन देण्यात आला असल्याचं सांगितलं जात आहे.
शीख नेत्यांनी हल्ल्याचा केला निषेध
ब्रिटनमध्ये दोन शीख वृद्ध व्यक्तींना झालेल्या मारहाणीच्या घटनेचा भारतातील शीख नेत्यांनी निषेध व्यक्त केला आहे. तसेच शीख फेडरेशन आणि यूके स्थित शीख हक्क संघटनांनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं की, “एका शीख व्यक्तीची पगडी जबरदस्तीने काढून टाकण्यात आली, या हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. हा जातीय द्वेषपूर्ण गुन्हा शीख समुदायाला लक्ष्य करणारा आहे.
काँग्रेसच्या पंजाब युनिटचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनी देखील या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी म्हटलं की, इंग्लंडमधील वॉल्व्हरहॅम्प्टन येथे दोन वृद्ध शीख व्यक्तींवर झालेल्या हल्ल्यामुळे मी अस्वस्थ आहे. हा द्वेषपूर्ण गुन्हा आहे. अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनी या प्रकरणी भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना ब्रिटन सरकारसमोर हा मुद्दा उपस्थित करण्याचं आवाहन केलं आहे.