Tirupati Temple : आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती बालाजी मंदिराशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानम मंदिर समितीने मंदिरात कार्यरत असलेल्या पण हिंदू नसलेल्या कर्मचाऱ्यांसाठी नवा ठराव मान्य केला आहे. या ठरावानुसार मंदिरात काम करणाऱ्या १८ कर्मचाऱ्यांना हटवण्यात आलं आहे. त्यांच्यासमोर आंध्र प्रदेशच्या इतर सरकारी विभागांमध्ये नोकरीचा पर्याय स्वीकारा किंवा स्वेच्छा निवृत्ती घ्या असे दोन पर्याय ठेवले आहेत. या निर्णयाची चर्चा रंगली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तिरुमला तिरुपती मंदिर समितीने घेतलेला निर्णय चर्चेत

तिरुमला तिरुपती मंदिर समितीने १८ हिंदू नसलेल्या कर्मचाऱ्यांना हटवण्याचा निर्णय चर्चेत आला आहे. काही महिन्यांपूर्वी चंद्राबाबू नायडूंनी या मंदिराच्या प्रसाद लाडूंमध्ये वायएसआर सरकार असताना शुद्ध तूपाऐवजी जनावरांची चरबी वापरण्यात आली असा आरोप केला होता. ज्यामुळे एकच खळबळ माजली होती. त्यानंतर आता याच मंदिर समितीने हिंदू नसलेल्या १८ कर्मचाऱ्यांना हटवलं आहे.

TTD हे स्वतंत्र सरकारी विश्वस्त मंडळ

TTD अर्थात तिरुमला तिरुपती देवस्थानम हे स्वतंत्र सरकारी विश्वस्त मंडळ आहे. जगातल्या श्रीमंत मंदिरांमध्ये तिरुमला तिरुपती बालाजी मंदिराचा समावेश आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार TTD च्या नियमांमध्ये तीनवेळा दुरुस्ती करण्यात आली आहे. १९८९ मध्ये या मंदिराशी संबंधित एक आदेश होता ज्यात असं नमूद करण्यात आलं आहे की मंदिर प्रशासनाच्या प्रशासकीय पदांवर फक्त हिंदूंचीच नियुक्ती झाली पाहिजे. २०२४ मध्ये आंध्र प्रदेशात चंद्राबाबूंचं सरकार आलं. त्यानंतर कथितरित्या तिरुमला तिरुपती मंदिरात काम करणाऱ्या काहींनी त्यांच्या सहकाऱ्यांना दुसऱ्या धर्माच्या लोकांचे सहकारी आहात असं बोललं जात असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. दरम्यान मंदिर प्रशासनात काम करणाऱ्या पण हिंदू नसलेल्या १८ कर्मचाऱ्यांना हटवण्यात आलं आहे. दरम्यान या मंदिर प्रशासकीय सेवेत जे ७ हजार कर्मचारी कायमस्वरुपी तत्त्वावर नोकरी करतात त्यांच्यापैकी ३०० जण हे हिंदू नाहीत. त्यामुळे त्यांना बदली घ्यावी लागणार आहे किंवा स्वेच्छा निवृत्ती घ्यावी लागणार आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

संविधानातील तरतुदीप्रमाणेच मंदिर समितीने घेतला निर्णय

तिरुमला तिरुपती मंदिर समितीने घेतलेला हा निर्णय संविधानाच्या अनुच्छेद १६ (५) वर आधारित आहे. संविधानातील या तरतुदीनुसार धर्मसंस्था, मंदिरं, धार्मिक स्थळं या ठिकाणी त्याच धर्माचे लोक नोकरीसाठी असावेत. त्यानुसारच हा निर्णय घेण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tirupati temple board removes 18 non hindu employees what is the reason scj