US Tariffs : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता आणखी एक टॅरिफ बॉम्ब फोडला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे की हॉलिवूडच्या बाहेर निर्मिल्या जाणाऱ्या चित्रपटांवर १०० टक्के टॅरिफ लागणार आहे. हॉलिवूडचे चित्रपट अमेरिकेच्या बाहेर विविध देशांमध्ये शूट होत आहेत. अशातच आता ट्रम्प यांचा हा निर्णय फिल्ममेकर्सची डोकेदुखी वाढवणारा ठरला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणाले आपल्या देशातला चित्रपट व्यवसाय दुसऱ्या देशातल्या चित्रपट व्यावसायिकांनी चोरला आहे. एखाद्या लहान मुलाच्या तोंडातून कँडी हिसकवतात तसंच हे घडलं आहे. कॅलिफोर्नियावर या सगळ्याचा गेल्या काही वर्षांपासून जास्त खोलवर परिणाम झाला आहे. त्यामुळेच अमेरिकेच्या बाहेर तयार होणाऱ्या चित्रपटांवर मी आता १०० टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका सोडून इतर देशांमध्ये तयार होणाऱ्या चित्रपटांवर आता १०० टक्के टॅरिफ लागणार आहे. अमेरिकेत चित्रपट व्यवसाय वेगाने संपतो आहे. त्यामुळे हा निर्णय घेतल्याशिवाय काही पर्याय उरलेला नाही.
इतर देश आमच्या चित्रपट निर्मात्यांना आणि स्टुडिओजना अमेरिकेतून दूर नेण्यासाठी अनेक प्रकारची प्रोत्साहनं देत आहेत. हॉलिवूड आणि अमेरिकेतील इतर अनेक भाग उद्ध्वस्त होत आहेत. हा इतर राष्ट्रांचा एकत्रित प्रयत्न आहे आणि म्हणूनच, हा राष्ट्रीय सुरक्षेचा धोका आहे,” असे त्यांनी ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले.
ट्रम्प पुढे म्हणाले, “इतर गोष्टींव्यतिरिक्त हा संदेश आणि प्रचार आहे. म्हणून, मी वाणिज्य विभाग आणि युनायटेड स्टेट्स ट्रेड रिप्रेझेंटेटिव्हला तात्काळ अशा सर्व चित्रपटांवर १००% कर लावण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे अधिकार देत आहे, जे परदेशात तयार होऊन आपल्या देशात येत आहेत. आम्हाला अमेरिकेत बनलेले चित्रपट पुन्हा हवे आहेत!” लाइव्ह मिंटने हे वृत्त दिलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय चीनमुळे?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामागे चीन जबाबदार असल्याची चर्चा आहे. एप्रिल महिन्यात चीनने ही घोषणा केली होती की इंपोर्टेड अमेरिकेच्या चित्रपटांची संख्या कमी केली जाईल. ट्रम्प यांनी त्यावेळी चीनच्या वस्तूंवर टॅरिफ वाढवून १२५ टक्के इतका केला होता. त्यानंतर चीनच्या प्रशासनाने १० एप्रिलला ही घोषणा केली होती की अमेरिकेतल्या चित्रपटांची संख्या कमी केली जाईल. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी हॉलिवूडच्या बाहेर तयार होणाऱ्या चित्रपटांवर १०० टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे.