थायलंडमधील ब्रह्ममंदिरामध्ये सोमवारी सायंकाळी झालेल्या स्फोटानंतर मंगळवारी पुन्हा बँकॉकमध्ये स्फोट घडविण्यात आला. फेरी बोटींच्या पदपथावर बॉम्ब फेकण्यात आला. मात्र तो उडून पाण्यात पडून स्फोट झाल्याने सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.
ब्रह्ममंदिरामधील स्फोटाचा तपास सुरक्षा यंत्रणांनी सुरू केला असून मंदिरातील सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासण्यात आले आहे. यामध्ये एक संशयास्पद व्यक्ती दिसत असून त्याचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत.
ब्रह्ममंदिरामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ११ परदेशी नागरिकांसह २० जण ठार तर १२३ जण जखमी झाले आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासणात येत असून यामध्ये  संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका तरुणाचा शोध सुरू करण्यात आला आहे.
थायलंडचे पंतप्रधान प्रयुत चान-ओ-चा यांनी या घटनेचा निषेध नोंदवत थायलंडमध्ये झालेला हा आजवरचा सर्वात वाईट हल्ला असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच देशातील परदेशी नागरिकांना सुरक्षेची हमी त्यांनी दिली. सरकार सर्व ती खबरदारी घेत असून या कृत्यामागील व्यक्तींना लवकरच गजाआड करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
स्फोटामध्ये ठार झालेल्या परदेशी नागरिकांमध्ये पाच चीनी, चार मलेशियन आणि एका इंडोनेशियन नागरिकाचा समावेश आहे. या पाश्र्वभूमीवर सर्वत्र सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून बेटांवर येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी करण्यात येत आहे.