Bhopal Live-In Partner Murder: लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांमध्ये भांडणानंतर टोकाचे पाऊल उचलण्यात आल्याची अनेक प्रकरणे घडलेली आहेत. नुकतेच भोपाळमध्ये घडलेल्या एका प्रकरणामुळे आता खळबळ उडाली आहे. भोपाळच्या गायत्री नगर येथे राहणाऱ्या ३२ वर्षीय सचिन राजपूतने त्याची प्रेयसी रितीका सेनचा (वय २९) खून केला. यानंतर तिचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून ठेवत मृतदेहाशेजारीच दोन रात्री घालवल्या. जसे काहीच घडले नाही, असे दाखवत सचिन राजपूत त्याच घरात राहिला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ जूनच्या रात्री सचिन आणि रितीका यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. सचिन बेरोजगार आहे, तर रितीका एका खासगी कंपनीत काम करते. यावरून सचिनच्या मनात रितीकाबद्दल असूया निर्माण झाली होती. तसेच रितीकाचं तिच्या वरिष्ठासोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याचा संशय सचिनला वाटत होता. याच कारणावरून दोघांचं भांडण झालं, ज्यात रितीकाचा खून झाला.

खून केल्यानंतर सचिननं रितीकाचा मृतदेह बेडवर ठेवून वरून ब्लँकेट टाकले. ती झोपली असल्याचा बहाणा करत सचिन बिनदिक्कत त्याच खोलीत दोन दिवस राहिला. तसेच रितीकाच्या बाजूला तो रात्री झोपलाही. रितीकाच्या हत्येचा धक्का बसल्यामुळे सचिन दोन दिवस प्रचंड मद्यपान करत होता, असेही पोलिसांनी सांगितलं.

रविवारी २९ जून रोजी सचिननं नशेच्या अमलाखाली असताना अनुज नावाच्या मित्राला खून केल्याची माहिती दिली. पण सचिन नशेत असल्यामुळे असा बडबडत असावा, असं वाटल्यामुळं अनुजनं दुर्लक्ष केलं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा हेच सचिन सांगू लागल्यानंतर अनुजला धक्काच बसला. त्यानेच पोलिसांना फोन करून सदर गुन्ह्याची माहिती दिली.

बजारीया पोलीस ठाण्याचे पोलीस सचिन आणि रितीका राहत असलेल्या भाड्याच्या घरात पोहोचले, तेव्हा त्यांना धक्काच बसला. रितीकाचा मृतदेह अतिशय वाईट अवस्थेत होता.

सचिन विवाहित असून दोन मुलांचा बाप

पोलिसांनी सांगितले की, सचिन आणि रितीका साडे तीन वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. सचिन राजपूतचे लग्न झाले असून त्याला दोन मुले आहेत. २७ जूनच्या रात्री सचिन आणि रितीकामध्ये जोरदार भांडण झाले. सचिननं गळा दाबून रितीकाचा खून केला.