वाचाळपणासाठी प्रसिद्ध असणारे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे. धर्म आपले रक्षण करत असेल तर आपल्यालाही धर्माचे रक्षण केले पाहिजे. त्यासाठी देशातील हिंदुंनी स्वत:ची संख्या वाढवली पाहिजे, असे गिरीराज सिंह यांनी म्हटले. सहारणपूर जिल्ह्यामधील देवबंद भागामधील एका कार्यक्रमामध्ये बोलताना सिंह यांनी यासंदर्भातील मत व्यक्त केले. देशातील जनता राम मंदिराची मागणी करत आहे; मात्र देशात रामभक्तच शिल्लक राहिले नाहीत, तर राम मंदिराची स्थापना शक्य होईल काय, असा सवाल गिरीराज सिंह यांनी उपस्थित केला. त्यासाठी हिंदू समाजाने त्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. देशातील आठ राज्यात हिंदू समाजाच्या लोकांची संख्या सातत्याने घटत आहे. भारताची फाळणी झाल्यानंतर निर्माण झालेल्या पाकिस्तानमध्ये २२ टक्के हिंदू होते. आता त्यांची संख्या केवळ एक टक्का इतकी आहे. तर भारतात फाळणीच्यावेळी ९० टक्के हिंदू आणि १० टक्के मुस्लिम होते. मात्र, आता मुस्लिमांची संख्या २४ टक्क्यांवर गेली असून हिंदुंचा टक्का ७६ पर्यंत घटला आहे, असे गिरीराज सिंह यांनी म्हटले. उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गिरीराज सिंह यांच्या विधानाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वीच अयोध्येत राम मंदिर उभारणे हा २०१४ साली भाजपच्या जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दा होता. आपण त्यापासून पळ कसा काय काढू शकतो? आपल्याला हे आश्वासन पूर्ण केलेच पाहिजे, असे सांगत राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपला घरचा आहेर दिला होता. सुब्रमण्यम स्वामी यांनी राम मंदिरासंदर्भात जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करणे गरजेचे असल्याचे सांगितले. राम मंदिर बळजबरीने बांधावे असे माझे म्हणणे नाही. मात्र, त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाऊन प्रयत्न केले पाहिजेत. न्यायालयाने यासंदर्भातील म्हणणे ऐकून घेतले पाहिजे आणि हा मुद्दा निकाली काढला पाहिजे, असे मत सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केले होते.
संग्रहित लेख, दिनांक 24th Oct 2016 रोजी प्रकाशित
हिंदुंची लोकसंख्या वाढली नाही तर राम मंदिर कसे उभारणार?- गिरीराज सिंह
भारतात फाळणीच्यावेळी ९० टक्के हिंदू आणि १० टक्के मुस्लिम होते.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 24-10-2016 at 14:43 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union minister giriraj singh urges hindus to increase their population