US Economists Targets Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लागू केल्यानंतर त्यावर अमेरिकेतूनच विरोध करणाऱ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अमेरिकेतील काही तज्ज्ञांनी तर थेट अमेरिकेलाच या निर्णयाचा मोठा फटका बसण्याचा अंदाज वर्तवला आहे. अमेरिकेतील अर्थतज्ज्ञ रिचर्ड वोल्फ यांनी यासंदर्भात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीची व्हिडीओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. या मुलाखतीमध्ये रिचर्ड वोल्फ यांनी अमेरिका स्वत:च्याच पायावर धोंडा पाडून घेत असल्याचं मत व्यक्त केलं आहे. तसेच, हे म्हणजे उंदरानं हत्तीला मारण्यासारखं असल्याची खोचक टिप्पणीही त्यांनी केली.
काय म्हणाले रिचर्ड वूल्फ?
रिचर्ड वुल्फ यांनी अमेरिकेच्या भूमिकेवर परखड शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. “संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार लोकसंख्येचा विचार करता भारत हा पृथ्वीवरचा सर्वात मोठा देश आहे. त्यामुळे अमेरिकेनं भारताला काय करावं आणि काय करू नये हे सांगणं म्हणजे एखाद्या उंदरानं हत्तीला ठोसा मारण्यासारकं आहे”, असं वूल्फ म्हणाले.
“अमेरिका जगात सर्वात शक्तिशाली असल्याचा दावा करत असली, तरी भारतावर टॅरिफ लादून प्रत्यक्षात स्वत:च्याच पायावर धोंडा पाडून घेत आहे”, असंही वूल्फ म्हणाले.
‘रशिया टुडे’च्या पॉडकास्टमध्ये बोलताना वुल्फ यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्लाबोल केला. “जर डोनाल्ड ट्रम्प यांनी अशा प्रकारे भारतावर वाढीव टॅरिफ लागू केले, तर ज्याप्रकारे रशियानं त्यांचं इंधन विकण्यासाठी दुसरे पर्याय शोधले, त्याचप्रकारे भारतदेखील त्यांची उत्पादने विकण्यासाठी इतर देशांचे पर्याय शोधेल. यातून BRICS देश आणखी प्रबळ होतील. जर तुम्ही चीन, भारत व रशिया या ब्रिक्समधील तीन देशांचं एकत्रित उत्पादन पाहिलं, तर ते प्रमाण जगाच्या एकूण उत्पादनाच्या ३५ टक्के इतकं प्रचंड आहे. जी ७ चं प्रमाण त्यांच्यापेक्षा कमी म्हणजे २८ टक्के आहे”, अशा शब्दांत वूल्फ यांनी ट्रम्प यांना घरचा आहेर दिला.
“आपण एका ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होत आहोत”
दरम्यान, ब्रिक्सच्या सबळीकरणासाठी ट्रम्प कारणीभूत ठरत असल्याचा दावा वूल्फ यांनी केला. “डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या धोरणांच्या माध्यमातून ब्रिक्सला अधिकाधिक मोठं, एकसंध आणि यशस्वी बनवत आहेत. ब्रिक्सच्या रुपाने पश्चात्य बाजारपेठेला एक मोठा पर्याय ट्रम्प उभा करत आहेत. आपण एका ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होत आहोत”, असंही वूल्फ यांनी नमूद केलं.
काय आहे BRICS?
ब्रिक्स ही १० देशांची एक आंतरराष्ट्रीय संघटना असून त्यात अमेरिकेचा समावेश नाही. या दहा देशांमध्ये ब्राझिल, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण आणि संयुक्त अरब अमिरात या देशांचा समावेश आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील पाश्चात्य राष्ट्रांच्या प्रभावाला पर्याय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ब्रिक्स संघटना काम करते.