आयडीबीआय बँक, किंगफिशरच्या माजी प्रमुखांना अटक

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फरार उद्योगपती विजय मल्या यांच्या बुडीत कर्जाप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने आयडीबीआय बँकेच्या माजी अध्यक्षांसह तीन अधिकाऱ्यांना आणि किंगफिशर एअरलाइन्सच्या चार माजी अधिकाऱ्यांना सोमवारी अटक केली. नियम डावलून गैरमार्गाने कर्ज मंजुर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये आयडीबीआय बँकेचे माजी अध्यक्ष योगेश अगरवाल, तसेच सध्या टाळे लागलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी ए. रघुनाथन यांचा समावेश आहे. त्यापूर्वी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या १२ सदस्यांच्या चमूने मल्या यांच्या मालकीच्या यूबी समूहाच्या बंगळुरूतील कार्यालयावर धाड टाकून तेथील कागदपत्रे तपासली. एकूण ११ ठिकाणी या धाडी  टाकण्यात आल्या. वेगवेगळ्या शहरांमधून आयडीबीआयच्या ओ. व्ही बुंदेलू, एसकेव्ही श्रीनिवासन आणि आर एस श्रीधर यांनाही अटक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच किंगफिशरचे शैलेश बोरके, ए.सी शहा आणि अमित नाडकर्णी यांनाही अटक झाली आहे. ए. रघुनाथन यांना मुंबईतून तर अगरवाल यांना दिल्लीमध्ये पकडण्यात आले. अगरवाल यांनी या प्रकरणातील  कर्ज मंजूर केल्याचा सीबीआयचा दावा आहे.

किंगफिशर एअरलाइन्सला स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील १७ बँकांच्या संघाने ६,३०४ कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. तीनच दिवसांपूर्वी या थकलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी मालमत्तांवर ताब्याची प्रक्रिया सुरू करण्यास बंगळुरूच्या कर्जवसुली लवादाने बँकांना परवानगी दिली आहे. न्यायालयाने फरारी घोषित केलेले मल्या हे २ मार्च २०१६ रोजी देशाबाहेर गेले असून, सध्या ब्रिटनमध्ये वास्तव्यास असल्याचे समजते.

अटक झालेल्यांची नावे

  • योगेश अगरवाल – माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक – आयडीबीआय बँक
  • बी. के. बत्रा – माजी उपव्यवस्थापकीय संचालक – आयडीबीआय बँक
  • ओ. व्ही. बुंदेलू – माजी उपव्यवस्थापकीय संचालक – आयडीबीआय बँक
  • एस. के. व्ही. श्रीनिवासन – माजी कार्यकारी संचालक – आयडीबीआय बँक
  • आर. एस. श्रीधर – माजी महाव्यवस्थापक – आयडीबीआय बँक
  • ए. रघुनाथन – मुख्य वित्तीय अधिकारी, किंगफिशर
  • शैलेश बोरके – सहाय्यक उपाध्यक्ष – किंगफिशर
  • अमित नाडकर्णी – उपमहाव्यवस्थापक (फायनान्स) – किंगफिशर एअरलाइन्स
  • ए. सी. शाह – वरिष्ठ व्यवस्थापक (अकाऊंट्स) – किंगफिशर एअरलाइन्स
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay mallya bad debts issue