मद्यसम्राट व युनायटेड ब्रुअरीजचे माजी अध्यक्ष विजय मल्या लागोपाठ तिसऱ्यांदा सक्तवसुली संचालनालयापुढे अनुपस्थित राहिले आहेत. त्यांनी आता उपस्थितीसाठी मे महिन्यापर्यंत मुदत मागितली आहे. आयडीबीआयचे ९०० कोटींचे कर्ज थकवल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने मल्या यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते.
मल्या यांनी चौकशी अधिकाऱ्यांना अशी माहिती दिली, की आज ते व्यक्तिगत पातळीवर उपस्थित राहू शकत नाहीत, कारण सर्वोच्च न्यायालयात कर्जाचे हे प्रकरण सुरू आहे, पण माझे वकील तुम्हाला चौकशी पुढे नेण्यात मदत करू शकतील. आता सक्तवसुली संचालनालय यावर पुढे काय कारवाई करणार हे अजून समजलेले नाही. मल्या यांनी उपस्थितीसाठी मे महिन्यापर्यंत मुदत मागितली आहे. गेल्या आठवडय़ातही त्यांनी चौकशी अधिकाऱ्यांची उपस्थितीची विनंती धुडकावून लावली होती. पुढे काय करायचे ते ठरवले जाईल, असे सक्तवसुली संचालनालयाच्या सूत्रांनी सांगितले. गेल्या आठवडय़ात सक्तवसुली संचालनालयाने ९ एप्रिलला उपस्थितीसाठी मल्या यांच्यावर समन्स बजावले होते. त्याआधी त्यांनी १८ मार्च व २ एप्रिल या दोन तारखांनाही काहीतरी सबबी सांगून उपस्थित राहण्याचे टाळले होते. तीनदा उपस्थितीचा आदेश धुडकावल्यानंतर त्या व्यक्तीचा पासपोर्ट रद्द करता येतो व अजामीनपात्र अटक वॉरंट काढता येते. ९ एप्रिलचे समन्स शेवटचे राहील असे सक्तवसुली संचालनालयाने आधी सांगितले होते.
आतापर्यंत चौकशीसाठी उपस्थिती लांबणीवर टाकण्याची त्यांची विनंती मान्य करण्यात आली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असून, कर्जवसुलीवर आपण न्यायालयात मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यामुळे चौकशीस उपस्थित राहू शकत नाही असे कारण मल्या यांनी दिले होते.
संग्रहित लेख, दिनांक 10th Apr 2016 रोजी प्रकाशित
मल्या तिसऱ्यांदा अनुपस्थित सक्तवसुली संचालनालयाकडे मे महिन्यापर्यंत मुदत मागितली
विजय मल्या लागोपाठ तिसऱ्यांदा सक्तवसुली संचालनालयापुढे अनुपस्थित राहिले आहेत.
First published on: 10-04-2016 at 00:21 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay mallya skips ed for third time seeks time till may