Pahalgam Attack: जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले दिवंगत भारतीय नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी नरवाल यांनी गुरुवारी मुस्लिमांना किंवा काश्मिरींना लक्ष्य करू नका असे आवाहन केले.

पहलगाममधील बैसरन कुरणात दहशतवाद्यांना बळी पडलेल्या २६ जणांमध्ये हरियाणातील करनाल येथील २६ वर्षीय भारतीय नौदल अधिकारी विनय नरवाल यांचाही समावेश होता. पहलगाम दहशतवादी हल्ला अलिकडच्या काळात जम्मू आणि काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेल्या सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक होता.

दरम्यान विनय नरवाल आणि हिमांशी यांचे १६ एप्रिल रोजी लग्न झाले होते. त्यानंतर ते छोट्या सुट्टीसाठी काश्मीरला गेले होते.

आम्हाला मुस्लिम किंवा काश्मिरी लोकांच्या

करनाल येथे पत्रकारांशी बोलताना दिवंगत नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी म्हणाल्या की, “आम्हाला मुस्लिम किंवा काश्मिरी लोकांच्या विरोधात जायचे नाहीत. आम्हाला फक्त शांतता हवी आहे. अर्थात, आम्हाला न्याय हवा आहे.” याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.

आई आणि पत्नी हिमांशी यांना अश्रू अनावर…

विनय नरवाल यांच्या २७ व्या जयंतीनिमित्त हरियाणातील करनाल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नौदल अधिकारी विनय यांना श्रद्धांजली वाहताना नरवाल यांच्या आई आणि पत्नी हिमांशी यांना अश्रू अनावर झाले. करनाल येथील स्वयंसेवी संस्था नॅशनल इंटिग्रेटेड फोरम ऑफ आर्टिस्ट्स अँड अ‍ॅक्टिव्हिस्ट्सने हे शिबिर आयोजित केले होते. याबाबत हिंदुस्तान टाइम्सने वृत्त दिले आहे.

नौदलात दीड वर्षे सेवा

दरम्यान २३ एप्रिल रोजी कर्नाल येथे विनय नरवाल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. २०२२ मध्ये नौदलात दाखल झाल्यानंतर नरवाल गेल्या दीड वर्षांपासून कोची येथील दक्षिण नौदल कमांडमध्ये सेवा देत होते. दिवंगत नौदल अधिकारी विनय नरवाल यांचे त्यांच्या सहकाऱ्यांनी “एक आनंदी आणि समर्पित अधिकारी”, असे वर्णन केले आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ला

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील लोकप्रिय पर्यटनस्थळ असलेल्या पहलगाम येथे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी पर्यटाकांवर गोळीबार केला होता. त्यामध्ये २६ पर्यटक मृत्युमुखी पडले होते. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये २७ वर्षांचे नौदल अधिकारी विनय नरवाल यांचाही समावेश होता.