भारतीय क्रिकेट संघ विंडीज दौऱ्यावर आहे. या मालिकेतील २ सामने भारताने जिंकले. त्यामुळे भारताने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने या दौऱ्यातून माघार घेतली आहे. धोनी दोन महिन्यांसाठी भारतीय लष्करासोबत आहे. ३१ जुलैपासून त्याने काश्मीरमधील त्याला नेमून दिलेल्या भागात गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता धोनी लष्कराच्या गणवेशात दिसत असून सध्या त्याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये धोनी क्रिकेट नव्हे, तर आपल्या बटालियनमधील सहकाऱ्यांसोबत व्हॉलीबॉल खेळताना दिसत आहे.

धोनी सध्या भारतीय लष्कराच्या कॅम्पमध्ये आहे. भारतीय सैन्यात सेवा देता यावी आणि भारतीयांची सेवा करता यावी, यासाठी धोनीने टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार घेतली. धोनी ज्या बटालियनमध्ये आहे, ती बटालियन विशेष सैनिकांची आहे. यात देशातील विविध विभागातून आलेले जवान आहेत. धोनीला येथे दिवस आणि रात्र अशा शिफ्टमध्ये काम करावे लागणार आहे. या वेळी धोनीकडे ५ किलो वजनाच्या ३ मॅगझीन, ३ किलोग्रॅम वजनाचा पोशाख, २ किलो वजनाचे बूट, ४ किलोचे ३ ते ६ ग्रेनेड, १ किलोचे हेल्मेट आणि ४ किलोचे बुलेटप्रुफ जॅकेट असे एकूण १९ किलो वजन असणार आहे.

“धोनी आता १०६ टेरिटॉरियर आर्मी बटालियनचा सदस्य (पॅरा) आहे. त्यामुळे तो आता अनेकांचे रक्षण करू शकतो. ही बटालियन अत्यंत दमदार कामगिरी करणारी बटालियन आहे आणि तो हाच बटालियनचा भाग आहे, त्यामुळे त्याला सुरक्षा पुरवण्याची गरज लागणार नाही”, असा विश्वास लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी धोनीबाबत बोलताना व्यक्त केला आहे.