ढाका : बांगलादेशात रविवारी ७ जानेवारीला सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. विद्यमान पंतप्रधान शेख हसीना यांचा अवामी लीग पुन्हा विजयी होऊन त्या सलग चौथ्यांदा पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. मतदानासाठी सुरक्षेसह सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. प्रमुख विरोधी पक्ष बीएनपीने निवडणुकीवर बहिष्कार टाकला असून शनिवारपासून बेकायदा सरकारविरोधात ४८ तासांचा देशव्यापी बंद पुकारला आहे. दरम्यान, शुक्रवारी झालेल्या रेल्वे जळितकांड प्रकरणात बीएनपीच्या नेत्यासह आठ जणांना अटक करण्यात आली. या घटनेत किमान चौघांचा मृत्यू झाला होता.