हैदराबाद आणि सिकंदराबाद येथील कॅन्टोन्मेंट हद्दीतील संरक्षण क्षेत्रातील वीज आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा खंडित करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला आहे. लोकल मिलिटरी अथॉरिटी जर रस्ते बंद करून नागरिकांची गैरसोय करत राहील आणि चेकडॅम बांधून पाण्याच्या मुक्त प्रवाहात आणि विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करत असतील, तर त्यांचा वीज आणि पाण्याचा पुरवठा खंडित करू, असं तेलंगणाचे मंत्री केटी रामाराव विधानसभेत म्हणाले.
शनिवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी कौसर मोहिउद्दीन आणि इतर सदस्यांनी स्ट्रॅटेजिक नाला डेव्हलपमेंट प्रोग्रामवर उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री केटी रामाराव यांनी लोकल मिलिटरी अथॉरिटीला कडक इशारा दिला आहे. तसेच या सर्व समस्यांबाबत लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा करा, असे आदेश त्यांनी विशेष मुख्य सचिव अरविंद कुमार यांना दिले. जर त्यांनी राज्य सरकारच्या विनंतीकडे लक्ष दिले नाही, तर छावणीच्या हद्दीतील संरक्षण भागात वीज आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद करा, असं ते म्हणआले.
मोहिउद्दीन म्हणाले होते की, लष्करी अधिकाऱ्यांनी हकीमपेट/लंगर हौज येथे बलकापूर नाल्यावर एक चेक डॅम बांधला होता, ज्यामुळे शाथम टाकीला धोका निर्माण झाला होता आणि त्यामुळे शहरातील सखल भाग पाण्याखाली गेला होता. यावर रामाराव म्हणाले की, सिकंदराबाद कॅन्टोन्मेंट परिसरातील रस्ते बंद केल्यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. या समस्यांव्यतिरिक्त, नाल्यांमध्ये पाण्याच्या प्रवाहात अडथळा आणणारे चेक बंधारे बांधण्यात आले आहेत. गोलकोंडा किल्ल्याजवळील शाथाम टाकीतून पाण्याचा मुक्त प्रवाह कायम करण्यासाठी, काही कामे प्रस्तावित करण्यात आली होती, परंतु भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने काही क्षुल्लक कारणांमुळे परवानगी नाकारली, असंही त्यांनी सांगितलं.
ऑक्टोबर २०२० मध्ये हैदराबादच्या पुरानंतर मदतीसाठी कोणताही निधी न दिल्याबद्दल रामाराव यांनी केंद्र सरकारवर टीका केली. सिकंदराबादचे खासदार असलेले केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले की, किशन रेड्डी जरी शहराच्या एका भागाचे प्रतिनिधीत्व करत असले तरी त्यांनी केंद्रीय निधी मिळवून शहरातील लोकांना मदत करण्यात काही रस दाखविला नाही.