Donald Trump On US-China Tariff War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील काही महिन्यांपासून जगातील अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादण्याचा धडाका लावला आहे. एवढंच नाही तर ट्रम्प हे सातत्याने भारत आणि चीनला लक्ष्य करत असल्याचं दिसून येत आहे. एका आढवड्यापूर्वीच ट्रम्प यांनी चीनला लक्ष्य करत चिनी वस्तूंवर १०० टक्के आयातशुल्क (टॅरिफ) लादण्याची घोषणा केली. त्यामुळे चीनला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
यातच आता ट्रम्प यांनी चीनवर पुन्हा एकदा आणखी टॅरिफ लादण्याची धमकी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या नव्या भूमिकेमुळे जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील व्यापार तणाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण याआधी चीनने ट्रम्प यांच्या व्यापार कराला जशास तसं प्रत्युत्तर दिलेलं आहे. आता ट्रम्प यांनी म्हटलं की, ‘आम्ही आता चीनवर आणखी १५५ टक्के टॅरिफ लादू’. दरम्यान, अमेरिकेने आता चीनवर आणखी टॅरिफ लादलं तर चीनसाठी हे मोठं आर्थिक संकट ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं?
ट्रम्प यांनी सोमवारी इशारा दिला की, “जर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकेबरोबर निष्पक्ष करार केला नाही तर १ नोव्हेंबरपासून चिनी वस्तूंवर १५५ टक्क्यापर्यंत कर लागू केले जाऊ शकतात”, असं ट्रम्प यांनी म्हटलं. ट्रम्प यांच्या या विधानामुळे जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांत व्यापारावरून तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
एका पत्रकाराच्या प्रश्नाचं उत्तर देताना ट्रम्प म्हणाले, “मला वाटतं की चीन आमचा खूप आदर करतो. ते आम्हाला टॅरिफच्या स्वरूपात भरपूर पैसे देत आहेत. तुम्हाला माहिती आहेच की, ते ५५ टक्के देत आहेत, ते खूप पैसे आहेत. चीन ५५ टक्के टॅरिफ देत आहे. पण आम्ही करारावर पोहोचलो नाही, तर त्यांना १ नोव्हेंबरपासून १५५ टक्टे टॅरिफ भरावा लागू शकतो. पण मला अपेक्षा आहे की आम्ही कदाचित चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत एक अतिशय निष्पक्ष व्यापार करार करू. मला वाटतं की तुमच्यापैकी बहुतेक जण तिथे असतील.”
डोनाल्ड ट्रम्प यांची वक्रदृष्टी आता चीनवर
ट्रम्प यांनी शुक्रवारी चीनला लक्ष्य करत नव्याने टॅरिफ लादण्याची घोषणा नुकतीच केलेली आहे. १ नोव्हेंबरपासून चीनच्या सर्व वस्तूंवर अतिरिक्त १०० टक्के आयातशूल्क (टॅरिफ) आकारले जाणार असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे. तसेच अमेरिकेत निर्माण केलेल्या क्रिटिकल सॉफ्टवेअरवरही कठोर नियंत्रण आणण्याची योजना त्यांनी जाहीर केली. यापुढे असे सॉफ्टवेअर निर्यात करण्यावर बंधने येतील असंही त्यांनी म्हटलं होतं.
ट्रुथ या सोशल मीडियावर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पोस्ट लिहून याबाबतची माहिती दिली होती. चीनच्या व्यापार धोरणावर त्यांनी टीका करत म्हटलं होतं की, चीनने व्यापारात असाधारण अशी आक्रमकता अवलंबली आहे. त्याचा परिणाम जगातील सर्व देशांवर होईल. चीनच्या धोरणांना अमेरिका कठोरपणे प्रत्युत्तर देईल, असा इशारा त्यांनी दिला होता.ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं, “१ नोव्हेंबर २०२५ पासून (किंवा त्याआधी, चीन काय निर्णय घेतो हे पाहून) अमेरिका चीनच्या सर्व आयातीवर १०० टक्के टॅरिफ लादत आहे. सध्या लागू असलेल्या टॅरिफ व्यतिरिक्त हे नवे शुल्क असेल. तसेच १ नोव्हेंबर पासून आम्ही अमेरिकेतून निर्यात होणाऱ्या क्रिटिकल सॉफ्टवेअरवरही नियंत्रण आणू.”