बेलर विद्यापीठाचे संशोधन

हवामान बदलांमुळे कृषी जमिनीचा वापर वाढला असून, लोकसंख्यावाढीमुळे नेपाळमध्ये आगामी काळात पाणीटंचाई जाणवणार आहे असे एका नव्या अभ्यासात म्हटले आहे. माती व जल तपासणी साधन (स्वाट)च्या मदतीने बेलर विद्यापीठाच्या संशोधकांनी हवामान बदलांमुळे आगामी काळात बर्फ कुठे वितळेल, त्याचे पाणी कुठून कुठे जाईल, हवामान, स्थानशास्त्रीय स्थिती काय असेल, पाण्याची उपलब्धता किती असेल याचा अभ्यास नेपाळच्या संदर्भात केला आहे. हवामान बदलांमुळे कृषी जमिनीचा वापर वाढला असून, लोकसंख्यावाढही हिमालय पर्वतीय खोऱ्यात होत असून, त्याचा वाईट परिणाम पाण्याच्या उपलब्धतेवर होत आहे, त्यामुळे नैसर्गिक आपत्ती व अन्न असुरक्षेच्या काळात आणखी वाईट अनुभव येण्याची शक्यता आहे. नेपाळमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवण्याची शक्यता वाढणार आहे.
साऊथ डाकोटा स्टेट युनिव्हर्सिटीचे संशोधन सहायक राम पी. न्यूपेन यांनी सांगितले, की हवामान बदलांचा हिमालयीन पर्वतीय प्रदेशात जमीन वापर, जलवहन या प्रक्रियांवर काय परिणाम होईल याचा अभ्यास करण्यात आला असून, नेपाळला त्यामुळे यात महत्त्वाचे स्थान होते. नेपाळमधील ७० टक्के लोक शेतीवर अवलंबून असल्याने या भागात दारिद्रय़ाचा प्रश्न भेडसावणार आहे. नेपाळच्या जनतेपुढे आगामी काळात अनेक आव्हाने असतील, त्यात जमिनीचा पोत घसरणार असून अन्न उत्पादनावर विपरीत परिणाम होणार आहे, त्यामुळे मुलांचे कुपोषण होईल असे बेलर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस व पुरातत्त्व संस्थेचे संचालक सारा अ‍ॅलेक्झांडर यांनी म्हटले आहे. जीवशास्त्राचे प्राध्यापक जोसेफ व्हाईट यांनी सांगितल्यानुसार तापमान व पावसास अनुकूल स्थितीतही टोकाचे बदल दिसतील. जमिनीची धूप झालेली दिसेल. जमिनीच्या वापराच्या उद्देशातील फरकही याला कारणीभूत आहेत. हिमनद्या, बर्फाचे पाणी, मान्सूनला आवश्यक अवक्षेप क्रिया यात महत्त्वाच्या असून त्यातही बदल होण्याची शक्यता आहे.