AAIB’s Preliminary Report Air India Plane Crash: एअर इंडिया विमान अपघातानंतर विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) या संस्थेकडून आज प्राथमिक अहवाल जाहीर करण्यात आला आहे. या अहवालावर नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “एएआयबीने चांगला तपास केला. १२ जून रोजी अपघात झाल्यानंतर १३ जून रोजी ब्लॅक बॉक्स शोधला. ब्लॅक बॉक्समधील माहिती संकलित करणे, त्याचे विश्लेषण करणे आणि सर्व पुराव्यांचा अभ्यास करून एका महिन्यात प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला आहे. हा अंतिम अहवाल नाही. त्यामुळे आज काही अधिक बोलता येणार नाही.”

अंतिम निष्कर्ष काढू नका

कॉकपिटमध्ये वैमानिकांमध्ये झालेल्या संवादाबद्दल बोलताना ते म्हणाले, “एका पायलटने दुसऱ्या पायलटला म्हटले की, इंधन पुरवठा करणारा स्विच तू बंद केलास का? दुसऱ्या पायलटने उत्तर देताना म्हटले, “मी बंद केले नाही.” या संवादावरून कोणताही अंतिम निष्कर्ष काढला जाऊ शकत नाही. शेवटी हे यंत्र आहे. त्यात तांत्रिक अडचणी कधीही येऊ शकतात. हा संवेदनशील विषय असून आताच यावर अधिक बोलणे योग्य होणार नाही.

एएआयबी स्वायत्त संस्था, सरकारचा हस्तक्षेप नाही

मुरलीधर मोहोर पुढे म्हणाले की, या अहवालात सर्व गोष्टी अद्याप स्पष्ट झाल्या नसल्या तरी अंतिम अहवालात आणखी स्पष्टता येऊ शकेल. पुढच्या चौकशीतून खूप काही गोष्टी समोर येतील. एएआयबी ही स्वायत्त संस्था आहे. त्यांच्या कामात कुणाचीही दखल नसते. त्यांच्याकडून अपघाताची निष्पक्ष चौकशी केली जात आहे.

भारतातील वैमानिकांचे जगभरात चांगले नाव आहे. त्यामुळे प्राथमिक तपासात वेगळे काही घडले आहे, असे काही दिसत नाही, असे मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले.

आत्मनिर्भर भारताचे उदाहरण

तसेच ब्लॅक बॉक्स तपासणीसाठी विदेशात जाणार असल्याच्या ज्या चर्चा होत्या, त्या त्यानी फेटाळून लावल्या. ते म्हणाले, ब्लॅक बॉक्सचे विश्लेषण करण्यासाठी तो विदेशात पाठविला जाणार असल्याच्या बिनबुडाच्या चर्चा मागच्या काळात झाल्या. पण भारत आत्मनिर्भर आहे. आपल्याकडेही अद्ययावत प्रयोगशाळा आहेत. देशातच ब्लॅक बॉक्सचे विश्लेषण करण्यात आले. त्यातून आपण माहिती मिळवली आहे.

प्राथमिक अहवालातून कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही. आज अपघाताला एक महिना होत आहे. महिन्याभरात एवढी माहिती गोळा करणे सोपे काम नाही. मी अपघातानंतर घटनास्थळी जाऊन आलो होतो, तिथली परिस्थिती पाहिली होती. त्यातूनही एएआयबीने माहिती मिळवली. गतकाळात हेलिकॉप्टरचा अपघात झाला तरी त्याचा ब्लॅक बॉक्स विदेशात पाठवला जायचा. पण आता भारतातच सर्व तपास होत आहे, यावर मुरलीधर मोहोळ यांनी जोर दिला.