अफगाणिस्तानात पुन्हा एकदा तालिबाननं सत्ता स्थापन केली आहे. अफगाणिस्तान सरकारनं तालिबानसमोर गुडघे टेकले आहेत. सत्तांतरण केल्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देखील देश सोडला आहे. उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनीही अफगाणिस्तान सोडला आहे. सध्या अफगाणिस्तानमध्ये भायानक चित्र आहे. तालिबानच्या वर्चस्वामुळे पुन्हा एकदा संकट निर्माण झालं आहे. देशातील नागरिक सामान न घेताच देश सोडून पळत असल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर चीनने तालिबानशी ‘मैत्रीपूर्ण संबंध’ प्रस्थापित करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काबूल काबीज केल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला. दरम्यान, तालिबानशी ‘मैत्रीपूर्ण संबंध’ प्रस्थापित करण्यास चीन तयार असल्याचे म्हटले आहे. चीन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी पत्रकारांना सांगितले की, “चीन अफगाणिस्तानच्या जनतेच्या अधिकाराचा आदर करतो आणि अफगाणिस्तानशी मैत्रीपूर्ण आणि सहकार्यपूर्ण संबंध विकसित करु इच्छितो.”

अमेरिकन सैनिकांचा हवेत गोळीबार

दरम्यान, अफगाणिस्तानची राजधानी काबुलच्या विमानतळावर जमलेल्या हजारो लोकांमध्ये चेंगराचेंगरी होऊन किमान ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तालिबानपासून वाचण्यासाठी हजारो लोक देशाबाहेर जाण्याच्या प्रयत्न करत आहेत. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिकन सैनिकांना हवेत गोळीबार देखील करावा लागला.

कट्टरपंथी इस्लामिक गट तालिबानचा नेता मुल्ला अब्दुल गनी बरदार अफगाणिस्तानचा नवा राष्ट्राध्यक्ष बनू शकतो, असे म्हटले जात आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, मुल्ला बरादरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे, ज्यामध्ये अफगाणिस्तानवर तालिबानचे नियंत्रण खूप कमी वेळेत प्रस्थापित झाल्याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला आहे.

तालिबानचे प्रवक्ते मोहम्मद नईम यांनी अल जझीरा टीव्हीला सांगितले की, “अफगाणिस्तानच्या लोकांसाठी आणि मुजाहिदीनसाठी आजचा दिवस खूप मोठा आहे. २० वर्षांचे बलिदान आणि मेहनत फळाला आली आहे. अल्लाहचे आभार.”

नवीन सरकारचे स्वरुप लवकरच स्पष्ट

“अफगाणिस्तानमधील नवीन सरकारचे स्वरूप काय असेल, ते लवकरच स्पष्ट होईल. तालिबान संपूर्ण जगापासून दूर राहू इच्छित नाही आणि आम्हाला शांततापूर्ण आंतरराष्ट्रीय संबंध हवे आहेत, “असे नईम म्हणाले.

अफगाण सरकारने विनाशर्त शरण येऊन सत्तेचे ‘शांततापूर्ण हस्तांतर’ करावे असे आवाहन तालिबानी बंडखोरांनी केले होते. त्यानंतर एका व्हिडिओमध्ये तालिबानी लोक राष्ट्रपती भवनात बसलेले दिसत आहेत.

नवीन शासन संपूर्ण परदेशी सैन्य परतल्यानंतरच

तालिबानच्या एका नेत्याने बंडखोर वेगवेगळ्या प्रांतातून पुन्हा एकत्र येत आहेत आणि नवीन शासन संरचना तयार करण्यासाठी परदेशी सैन्य निघून जाण्याची वाट पाहत आहेत असे रॉयटर्सला सांगितले.

“अफगाणांना दैनंदिन कामकाज पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि नागरिकांना घाबरवण्यासाठी काहीही करू नका,” असे आदेश तालिबानींना देण्यात आल्याचे देखील या नेत्याने सांगितले. “यानंतर लोकांचे जीवन अधिक चांगल्या प्रकारे चालू राहील, मी एवढेच सांगू शकतो,” असे त्यांनी रॉयटर्सला सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: While the whole world is expressing concern china extends a hand of friendship to the taliban srk