Sambhal Jama Masjid : अलाहाबाद उच्च न्यायालयाने १२ मार्च रोजी रंगकामाला परवानगी दिल्यानंतर उत्तर प्रदेशातील जामा मशि‍दीला पांढरा रंग देण्याचे काम रविवारी सुरू करण्यात आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. न्यायलयाच्या निर्देशांनंतर ASI म्हणजेच भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने मार्च १३ रोजी मशि‍दीचे मोजमाप केले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या वर्षी २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या हिंसाचारानंतर संभल येथे तणावाचे वातावरण आहे. हा हिंसाचार मुघल काळातील शाही जामा मशि‍दीच्या सर्व्हेनंतर उसळला होता. या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला होता तर पोलिसांसह अनेक जण जखमी झाले होते. दरम्यान या प्रकरणाची पुढील सुनावणी ही ८ एप्रिल रोजी होणार आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना एएसआयने काम सोपवलेल्या कंत्राटदाराने सांगितले की, आठ लोक हे काम करत आहेत आणि हे काम एक आठवड्याच्या आत पूर्ण करणे अपेक्षित आहे . कंत्राटदार म्हणाला की, “एकूण आठ लोक कामावर आहेत. पांढरा रंग देण्याचे काम सुरू झाले आहे… आम्ही एका आठवड्यात काम पूर्ण करू. आम्हाला फक्त मशिदीला पांढरा रंग देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आम्हाला एएसआयने काम सोपवले आहे,”

जामा मस्जिद समितीचे सेक्रेटरी मसूद फारुकी यांनी एएनआयशी बोलताना मशिदीला पांढरा रंग देण्यासाठी कामगार आले आहेत आणि फक्त बाहेरील भाग रंगवला जाईल अशी माहिती दिली.

२४ नोव्हेंबरच्या हिंसाचाराचा खटला न्यायालयात सुरू आहे, त्यामुळे १२ मार्च रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान अलाहाबाद उच्च न्यायालयाने कोणतीही छेडछाड न करता संभल येथील जामा मशि‍दीच्या बाहेरील बाजूला पांढरा रंग देण्याची आणि सजावटीसाठी रोशनाई करण्याची परवानगी दिली होती.

न्यायालयाच्या निर्देशानंतर, संभलच्या शाही जामा मशीद परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे, रमजानच्या पार्श्वभूमीवर हे रंगकाम करण्यासाठी तसेच यावर देखरेख ठेवण्यासाठी तीन सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे.

न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांनी एएसआय अधिकारी, एक वैज्ञानिक तज्ज्ञ आणि स्थानिक प्रशासनाचा प्रतिनिधी यांचा समावेश असलेले एक समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. ही समिती रंगकामावर देखरेख ठेवणार आहे, जेणेकरून या कामादरम्यान मशि‍दीच्या संरचनेला कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whitewashing of sambhal jama masjid begins after allahabad high court order uttar pradesh news rak