मोदी सरकारने आंध्रप्रदेशमधील जनतेला फसवले, अशी घणाघाती टीका करत अविश्वास प्रस्ताव मांडणारे तेलगू देसम पक्षाचे खासदार जयदेव गल्ला हे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. गल्ला हे देशातील श्रीमंत खासदारांपैकी एक असून अमारा राजा ग्रुप ऑफ कंपनीजचे ते मालक आहेत. अमारा राजा ग्रुप ऑफ कंपनी ही अॅमेरॉन बॅटरी तयार करते.

मोदी सरकारविरोधात शुक्रवारी लोकसभेत अविश्वास प्रस्ताव खासदार जयदेव गल्ला यांनी मांडला. मोदी सरकारच्या कारभारावर बोचरी टीका करत जयदेव गल्ला हे राष्ट्रीय राजकारणात चर्चेत आले आहेत. जयदेव गल्ला हे २०१४ मध्ये गुंटूर या मतदारसंघातून लोकसभेत निवडून आले. देशातील श्रीमंत खासदारांमध्ये त्यांचा समावेश आहे.

५२ वर्षीय जयदेव गल्ला यांचे वडील रामचंद्र नायडू गल्ला हे एनआरआय होते. त्यांनी अमारा राजा ग्रुप ऑफ कंपनीज सुरु केली होती. तीन दशकांपूर्वी ते अमेरिकेतून आंध्र प्रदेशमध्ये परतले होते. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात त्यांनी ६८३ कोटी रुपयांहून अधिक संपत्ती असल्याचे म्हटले होते.

जयदेव गल्ला यांनी तेलगू स्टार कृष्णा यांची कन्या पद्मावती यांच्याशी लग्न केले. जयदेव गल्ला यांच्या पत्नीचं माहेर हे आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या वजनदार आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चंद्राबाबू यांचा जन्म चित्तूर येथे झाला असून जयदेव गल्ला यांचा जन्मही तिथून ५० किलोमीटरवर असलेल्या गावात झाला आहे.