Acid Attack In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशात एका २५ वर्षीय तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला आहे. या घटनेतील पीडितेच्या लग्नाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अशात ती बँकेतून घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी तिला थांबवले. यावेळी एका तरुणाने, “जर तू माझी नाहीस तर तू दुसऱ्या कोणाचीही होणार नाहीस,” असे म्हणत तिच्यावर अ‍ॅसिड फेकले.

दरम्यान, हा हल्ला करणारा आरोपी राम जनम सिंग पटेल पीडित तरुणीचा प्रियकर होता. त्याचा पीडितेच्या लग्नाला होता. २७ मे रोजी पीडितेचे लग्न होणार होते.

पीडित तरुणी गुरुवारी, बँकेतून २०,००० रुपये काढून ती घरी परतत असताना, प्रियकाराने तिला बोलण्याच्या उद्देशाने थांबवले आणि तिच्यावर अ‍ॅसिड फेकले. या हल्ल्यात तरुणीचा चेहरा, खांदा, मान आणि शरीराचा वरचा भाग गंभीरपणे भाजला आहे. या हल्ल्यानंतर तिला तातडीने तिच्या गावातील आरोग्य केंद्रात नेण्यात आले, जिथे प्राथमिक उपचारानंतर तिला रुग्णालयात पाठवण्यात आले. ६० टक्के भाजल्यामुळे तिच्यावर आजमगडमधील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

या घटनेतील मुख्य आरोपी आणि पीडितेचा प्रियकर राम जनम सिंग पटेल आणि इतर दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. घटनेत वापरलेली बाईक जप्त करण्यात आली आहे. पोलीस चौकशीत आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याने प्रेयसी लग्न रद्द व्हावे आणि तिच्याशी लग्न करता येईल यासाठी तिच्या पाठीवर अ‍ॅसिड फेकले.

गेल्या महिन्यात, उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यात एका व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या कथित विवाहबाह्य संबंधांच्या संशयावरून त्याच्या पत्नी आणि दोन मुलींवर अ‍ॅसिड फेकल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच अ‍ॅसिड हल्ल्याची आणखी एक घटना घडली आहे.