दिल्ली रेल्वे स्थानकाबाहेर हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. आपल्या कुटुंबाबरोबर दिल्लीहून भोपाळला जाणाऱ्या एका महिलेचा रस्त्यावरील विजेच्या खांबाला स्पर्श झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. विजेचा धक्का बसल्याने कुटुंबाच्या डोळ्यादेखत महिलेचा जीव गेला आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या बहिणीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, साक्षी आहुजा असं मृत महिलेचं नाव आहे. घटनेच्या दिवशी रविवारी पहाटे साडेपाच वाजता मृत महिला आपली बहीण आणि तीन मुलांसह दिल्ली रेल्वेस्थानकावर आली होती. त्यांना भोपाळला जायचं होतं. पण दिल्ली रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्यावर पावसाचं पाणी साचलं होतं. या साचलेल्या पाण्यातून मार्ग काढण्यासाठी साक्षी यांनी रस्त्यावरील विजेच्या खांबाचा आधार घेतला. पण संबंधित खांबावर विद्युत प्रवाह सुरू असलेल्या तारा मोकळ्या सोडल्या होत्या, त्यामुळे विजेचा धक्का बसून महिलेचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा- सोलापूर रस्त्यावर भरधाव वाहनाची दाम्पत्याला धडक, दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला विजेचा धक्का बसल्यानंतर आजुबाजूच्या लोकांनी तिला मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दिल्ली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. महिलेला रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. वीज कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडली, असा आरोप मृत महिलेच्या बहिणीने केला. तसेच याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
हेही वाचा- उंच इमारतीवरुन मारली उडी! तरुणाचा जागेवरच मृत्यू, Video पाहून उडेल थरकाप
विजेचा धक्का कसा लागला याबद्दल माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, इन्सुलेशन बिघडल्याने खांबावरील तारांमधून विद्युतप्रवाह गळती झाली. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कुणाच्या निष्काळजीपणामुळे घडली? याचा तपास पोलीस करत आहेत. फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली असून तपास सुरू आहे.