Crime News : एका महिलेने सात वर्षांच्या मुलासमोर तिच्या पतीची हत्या केली. त्यानंतर गळफास घेऊन आयुष्य संपवलं. ही घटना गुजरातमधल्या अहमदाबाद या ठिकाणी घडली आहे. अहमदाबादमध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून काम करणाऱ्या मुकेश परमार आणि त्याची पत्नी संगीता या दोघांना पोलीस क्वार्टर मिळालं होतं. त्याच ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली. या दोघांमध्ये दीर्घकाळापासून वाद होते त्यातूनच ही घटना घडल्याची माहिती समोर येते आहे. मुकेश आणि संगीता या दोघांमध्ये सोमवारीही वाद झाला. ज्यानंतर संगीता यांनी टोकाचं पाऊल उचललं आणि पतीची हत्या करुन गळफास घेत आत्महत्या केली.
पोलीस उपायुक्त रवी मोहन सैनी यांनी काय सांगितलं?
पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. दरम्यान मुकेश आणि संगीता यांच्यात वाद होत होते यातून ही घटना घडल्याचं सकृतदर्शनी दिसतं आहे. मुकेश परमार हे वाहतूक विभागात काम करत होते. संगीता यांनी सात वर्षांच्या मुलासमोर मुकेश परमार यांची हत्या केली. एका लाकडी जाड दंडुक्याने संगीता यांनी मुकेश परमार यांच्या डोक्यावर वार केले. ज्यामध्ये मुकेश परमार यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर संगीता यांनी गळफास घेऊन आयुष्य संपवलं. तिची सुसाईड नोट आम्हाला मिळाली आहे त्यात तिने पतीशी होणारे वाद आर्थिक चणचण यातून हे पाऊल उचलल्याचं म्हटलं आहे अशीही माहिती सैनी यांनी दिली.
हत्येच्या दिवशी नेमकं काय घडलं?
या प्रकरणी पुढील चौकशी सुरु आहे. पोलीस उपायुक्त सैनी यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या दिवशी मुकेश यांची हत्या झाली त्या दिवशी सकाळीच या दोघांमध्ये वाद झाला. या दोघांचा वाद विकोपाला गेला. त्यानंतर संगीता यांनी मुकेश यांच्या डोक्यावर जाड दंडुक्याने वार केले. ज्यात मुकेश यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. ही संपूर्ण घटना सात वर्षांच्या मुलाच्या देखतच झाली. त्याने शेजारी जाऊन शेजाऱ्यांना घडला प्रकार सांगितला. शेजाऱ्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मुकेश यांचा मृतदेह आणि गळफास लावलेल्या अवस्थेत संगीता यांचा मृतदेह आढळून आला. ज्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आलं. इंडियन एक्स्प्रेसने याविषयीचं वृत्त दिलं आहे.