H-1B Visa Tragedy: अमेरिकेत विदेशी नागरिकांना नोकरीसाठी आवश्यक असलेल्या एच-१बी व्हिसासाठीचे शुल्क डोनाल्ड ट्रम्प यांनी १ लाख डॉलर्स एवढे केले. यानंतर जगभरात खळबळ उडाली. शुक्रवारी हा निर्णय घेतल्यानंतर त्याची रविवारपासून अंमलबजावणी होणार असल्याचेही ट्रम्प प्रशासनाने जाहीर केले. यानंतर अमेरिकेबाहेर गेलेल्या आयटी कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. मेटा, मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना रविवारच्या आत परतण्याचे आदेश दिले. याचा फटका रोममध्ये फिरण्यासाठी गेलेल्या एका जोडप्याला बसला.
एका तरूणीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत एच-१बी व्हिसा आणि तिच्या वैयक्तिक सुट्टीची उडालेली दाणादाण याबद्दल व्यथा मांडली. ट्रम्प यांनी व्हिसावर शुल्क वाढवल्यानंतर तिचा प्रियकर रोममध्ये प्रेयसीला एकटी सोडून निघून गेला.
या व्हिडीओमध्ये प्रेयसीने म्हटले की, ऐकायला विचित्र वाटेल. पण माझा प्रियकर मला इथे टाकून गेला. आम्ही रोममध्ये इटालियन पास्ता बनविणे शिकत होतो. क्लासरूममध्ये असताना त्याला व्हिसाचे शुल्क वाढविल्याची बातमी कळली. शनिवारी मध्यरात्रीपर्यंत अमेरिकेत न परतल्यास १ लाख डॉलर्स द्यावे लागणार होते. त्यामुळे शनिवारी अर्ध्या रात्री मला टाकून तो निघून गेला.
तरूणीने पुढे म्हटले, “आता मी रोममध्ये एकटीच आहे. त्याने मिळेल ती फ्लाईट पकडून अमेरिका गाठण्याचा प्रयत्न केला. आमची इटालियन सुट्टी पुन्हा कधीतरी साजरी होईल. फार ताणतणाव न घेता. पण मला त्या लोकांची काळजी वाटते, ज्यांना तिकीट खरेदी करता आले नसेल किंवा ते मिळाले नसेल. दुसरा विषय म्हणजे, जे अमेरिकेपासून दूर असतील आणि त्यांना वेळेत परतता येणार नाही. त्यांचे तर आयुष्य एका रात्रीत पूर्णपणे बदलले आहे. इतके सगळे वेगात घडेल, असे कुणालाही वाटले नसेल. जाऊद्या मी आता एकटीच खरेदीसाठी जाते.”
व्हाईट हाऊसनं गोंधळावर दिली प्रतिक्रिया
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसावर एक लाख डॉलर्सचे शुल्क लावण्याच्या घोषणेवर स्वाक्षरी करताच जगभरात खळबळ उडाली. एच-१बी व्हिसा मिळवणाऱ्यांमध्ये ७० टक्के भारतीय नागरिक आहेत. ट्रम्प प्रशासनाचे व्यापार विभागाचे सचिव हॉवर्ड ल्युटनिक यांनी हे वार्षिक शुल्क असेल असे सुरुवातीला सांगितले होते. मात्र नंतर व्हाईट हाऊसने त्यावर स्पष्टीकरण दिले.
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी रविवारी सकाळी सांगितले की, हे वार्षिक शुल्क नाही. तसेच पुढच्या लॉटरीत ज्यांना हा व्हिसा प्राप्त होईल, त्यांनाच शुल्क द्यावे लागणार आहे. जुन्या व्हिसाधारकांना शुल्क द्यावे लागणार नाही.
विशेष म्हणजे, राष्ट्रीय हितासाठी ज्यांना व्हिसा द्यावा लागणार आहे, त्यांना हे शुल्क माफ केले जाणार आहे.