पीटीआय, नवी दिल्ली

मृत्यूनंतर अवयवदान करण्याच्या संकल्पात पुरुषांच्या तुलनेत महिला आघाडीवर आहेत. राष्ट्रीय अवयव आणि उती प्रत्यारोपण संस्थेने (एनओटीटीओ) नुकत्याच सुरू केलेल्या संकेतस्थळावरील आकडेवारीवरून हे चित्र समोर आले. हा संकल्प करण्यासाठी या संकेतस्थळावर आपला आधार क्रमांक टाकून ‘लॉग ईन’ करता येते.

या संकेतस्थळावरील माहितीनुसार ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांची अवयवदान करण्याची संख्या सर्वाधिक आहे.  आकडेवारीनुसार ३० ते ४४ वयोगटातील ४० हजार ३२०, १८ ते २९ वयोगटातील २१ हजार ७५१, ४५ ते ५९ वयोगटातील १८ हजार १६० आणि ६० वर्षांवरील दोन हजार ५९२ व्यक्तींनी अवयव दान करण्याचा संकल्प केला आहे. यात ४७,०९४ महिला, ३५,७२६ पुरुष आणि १२ तृतीयपंथीयांचा समावेश आहे.

हेही वाचा >>>केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ ; रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस, रब्बीसाठी हमीभावात वाढ

‘एनओटीटीओ’चे संचालक डॉ अनिल कुमार यांनी सांगितले, की अवयव निकामी झालेल्या रुग्णांना वाचवण्यासाठी प्रत्यारोपण करण्यासाठी अशा अवयवांची नितांत गरज आहे. २०२२ मध्ये जगभर झालेल्या एकूण प्रत्यारोपण शस्त्रक्रियांत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय वैद्यकीय क्षेत्रात बहु-अवयव आणि दुर्मिळ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याची क्षमता विकसित केली आहे. मात्र, अद्यापही आवश्यक असलेल्या अवयवांची संख्या आणि प्रत्यारोपणासाठी उपलब्ध असलेल्या अवयवांची संख्या यांच्यात अजूनही मोठी तफावत आहे.

महाराष्ट्र आघाडीवर!

महाराष्ट्रातील नागरिकांनी सर्वाधिक म्हणजे २३ हजार ३६९ संकल्प नोंदवले आहेत. त्याखालोखाल १८ हजार ८४७ मध्य प्रदेशवासीयांनी आणि तेलंगणच्या ११ हजार ५६४ नागरिकांनी अवयवदानाचे संकल्प नोंदवले आहेत. या नागरिकांनी मृत्यूनंतर आपले मूत्रिपड, हृदय, यकृत, फुफ्फुसे आणि आतडे दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.