एकीकडे देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. तर दुसरीकडे कर्नाटकमधील काँग्रेसच्या आमदाराने बेरोजगारीवरुन वादग्रस्त विधान केलं आहे. तरुणांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी लाच द्यावी लागते तर तरुणींना सरकारी नोकरी मिळण्यासाठी एखाद्यासोबत झोपावं लागतं असं धक्कादायक विधान कर्नाटकचे काँग्रेस आमदार प्रियांक खर्गे यांनी केलं आहे. खर्गे यांच्या विधानानंतर मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
हेही वाचा- ‘पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट’ या दहशतवादी संघटनेने घेतली राजौरी हल्ल्याची जबाबदारी
घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी
कर्नाटक सरकारवर गंभीर आरोप करताना खर्गेंनी हे विधान केलं आहे. कर्नाटकात अनेक सरकारी पदभरतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच सरकारनं जलदगती न्यायालय स्थापन करण्याचीही त्यांनी मागणी केली आहे.
वादग्रस्त विधानानंतर खळबळ
सरकारने पदे विकण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मुलांना लाच द्यावी लागते तर महिलांना सरकारी नोकरी हवी असेल तर त्यांना कुणाकडे तरी झोपावे लागते. एका मंत्र्याने तरुणीला नोकरी देण्यासाठी शरीरसुखाची मागणी केली होती. घोटाळा उघड झाल्यानंतर त्या मंत्र्याने राजीनामा दिला होता. याबाबत माझ्याकडे पुरावा असल्याचा दावाही खर्गेंनी केला आहे. प्रियांक खर्गे यांच्या या वादग्रस्त विधानानंतर चांगलीच खळबळ उडाली आहे.