जगविख्यात ॲमेझॉन कंपनीत कर्मचाऱ्यांना अमानवीय वागणूक देत असल्याची माहिती समोर आली आहे. ॲमेझॉन कंपनीच्या हरियाणामधील मानेसर येथे असलेल्या गोदामातील कर्मचाऱ्यांचा ठरलेले टार्गेट पूर्ण करण्यासाठी छळ केला जात असल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे. २४ वर्षीय कर्मचाऱ्याने सांगितले की, आम्ही आठवड्यातून पाच दिवस रोज दहा तासांची शिफ्ट करतो. यावेळी आमचे वरिष्ठ अधूनमधून शौचालयात जाऊन कुणी वेळ घालवत आहे का? हे तपासतात. महिन्याला फक्त १०,०८८ इतके अत्यल्प वेतन मिळत असताना त्यात आम्हाला शौचालयास जायला आणि पाणी पिण्यासही निर्बंध घातलेले आहेत. इंडियन एक्सप्रेसने यासंबंधी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले आहे.

मानेसर येथील गोदामात काम करणाऱ्या आणखी एका कर्मचाऱ्याने सांगितले की, दहा तासांच्या शिफ्टमध्ये जेवण आणि चहासाठीचा ३० मिनिटांचा ब्रेक जरी टाळला तरी आम्ही चार ट्रकपेक्षा अधिक पार्सल लोड करू शकत नाही. दोन दिवसांपूर्वीच आम्हाला वरिष्ठांनी पाणी पिण्यासाठी आणि शौचालयाला न जाण्याची शपथ दिली आहे. या माध्यमातून आमचे ठरलेले लक्ष्य गाठण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

Live: “अण्णा हजारे जेव्हा अचानक जागे होतात…”, अजित पवार गटाच्या नेत्याची टीका

इंडियन एक्सप्रेसने कर्मचाऱ्यांनी केलेले आरोप समोर आणल्यानंतर ॲमेझॉन इंडियाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले जात आहेत. यानंतर ॲमेझॉन इंडियाच्या प्रवक्त्यांनी आपली बाजू मांडली. “या तक्रारी कुणी केल्या, याची आम्ही तपासणी करत आहोत. पण अशाप्रकारची वागणूक आम्ही कर्मचाऱ्यांना देत नाहीत. आमच्या व्यावसायिक व्यवस्थेत अशा अमानवीय गोष्टींना जागा नाही. जर अशा तक्रारी सत्य असल्याचे आमच्या निदर्शनास आले, तर आम्ही तात्काळ त्यावर निर्णय घेऊ. आमच्या व्यवस्थापकांना कर्मचाऱ्यांचे आरोग्य, सुरक्षा अबाधित राखण्यासंदर्भात पुन्हा एकदा प्रशिक्षण दिले जाईल”, अशी बाजू प्रवक्त्यांनी मांडली.

हरियाणात ज्या तक्रारी आल्या, तशाच प्रकारच्या तक्रारी २०२२ आणि २०२३ साली अमेरिकेतील कर्मचाऱ्यांनीही केल्या होत्या. ॲमेझॉनमध्ये काम करणे हे महिला कर्मचाऱ्यांसाठी आणखी आव्हानात्मक असते, असेही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. महिला कर्मचाऱ्यांनी सांगितले, “ॲमेझॉनच्या गोदामात महिलांसाठी वेगळी रूम नाही. जर कुणाला अस्वस्थ वाटत असेल तर थेट शौचालय किंवा लॉकर रुममध्ये जावे लागते. बेड असलेली एक खोली आहे, मात्र तिथे गेल्यावर १० मिनिटांतच कर्मचाऱ्यांना बाहेर काढले जाते. मी दिवसाचे नऊ तास पूर्णवेळ उभी राहून काम करते. या वेळेत मला ६० मोठे आणि ४० मध्यम आकाराचे बॉक्स प्रॉडक्टसह पॅकिंग करायचे असतात.”

युनियन नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना त्रास

ॲमेझॉन इंडियाच्या कर्मचारी असोसिएशनचे संयोजक धर्मेंद्र कुमार यांनी यांनी सांगितले की, दिल्लीतील ग्राहकांना सेवा पुरविण्यासाठी हरियाणातील गोदामे कमीत कमी खर्चात चालविले जातात. दिल्लीमध्ये किमान वेतन २१ ते २३ हजारांच्या घरात आहे. तर हरियाणात तेच वेतन ११ ते १३ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. मानेसर येथील गोदामात पूर्ण न होण्यासारखी टार्गेट दिली जातात. तसेच कर्मचाऱ्यांना बसण्याची नीट व्यवस्था नाही. कारखाना कायद्याचेही इथे उल्लंघन होत आहे. कामगार निरीक्षक कर्मचाऱ्यांसाठी दुरूस्त्या सुचवू शकतात. पण इच्छाशक्तीचा अभाव दिसतो. तसेच युनियन नसल्यामुळेही कर्मचाऱ्यांना त्रास भोगावा लागत आहे.