Xi Jinping Lee Jae-Myung Xiaomi Smartphone Exchange: चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग दोन दिवसांच्या दक्षिण कोरिया दौऱ्यावर होते. यादरम्यान शी जिनपिंग आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे-म्युंग यांच्यात स्मार्टफोन सुरक्षेबाबत झालेल्या हलक्याफुलक्या चर्चेची सध्या जगभरात चर्चा होत आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, यावेळी शी जिनपिंग यांनी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे-म्युंग यांना दोन शाओमी स्मार्टफोन भेट म्हणून दिले. एक त्यांच्यासाठी आणि एक त्यांच्या पत्नीसाठी.

यावेळी दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांनी शी जिनपिंग यांना, “हे फोन सुरक्षित आहेत का?” असा प्रश्न विचारताच उपस्थितांमध्ये मोठा हशा पिकला. यावर शी जिनपिंग यांनी प्री-इन्स्टॉल्ड सॉफ्टवेअरचा संदर्भ देत हसत उत्तर दिले, “तुम्ही तपासू शकता की काही बॅकडोअर (हेरगिरी सॉफ्टवेअर) आहेत का.”

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग क्वचितच सार्वजनिक ठिकाणी उत्स्फूर्तपणे बोलताना दिसतात, त्यामुळे त्यांनी केलेल्या या हस्यविनोदांची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

चीनी तंत्रज्ञान आणि हेरगिरीबद्दलच्या दीर्घकालीन चिंतेच्या पार्श्वभूमीवर ही भेटवस्तूंची देवाणघेवाण झाली आहे. अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियासह पाश्चात्य देशांनी त्यांच्या 5G नेटवर्कमध्ये हुवावेच्या सहभागावर बंदी घातली आहे, तर शाओमीला अमेरिकेने काळ्या यादीत टाकले होते. यानंतर शाओमीने न्यायालयात या निर्णयाला यशस्वीरित्या आव्हान दिले होते.

सप्टेंबरमध्ये, काही चिनी हॅकर्सवर अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्या आणि कायदेशीर कंपन्यांविरुद्ध सायबर हेरगिरी कारवाया केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेची गुपिते अनेकदा चोरण्याचा प्रयत्न केला, परंतु ते यशस्वी झाले नाहीत, असे गुगलने सांगितल्याचे वृत्त ब्लूमबर्गने दिले होते.

चीनने हेरगिरीसाठी वापरलेले तंत्रज्ञान हे एकमेव साधन नाही. द टाइम्सच्या अलीकडील वृत्तानुसार, चीन सिलिकॉन व्हॅलीमधील व्यावसायिकांना फसवण्यासाठी आणि हेरगिरी करण्यासाठी “लैंगिक युद्धाच्या” युक्त्याही वापरत आहे.

दुसरीकडे, दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे-म्युंग यांनी शी जिनपिंग यांना जेजू बेटावरील प्रसिद्ध तोरेया नुकिफेरा या मौल्यवान वृक्षाच्या लाकडापासून बनवलेला “अत्युत्तम” गो बोर्ड आणि पारंपरिक शिंपल्यांच्या नक्षीने सजवलेला लॅकर ट्रे भेट म्हणून दिला.

या भेटीदरम्यान, दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे-म्युंग यांनी अण्वस्त्रसज्ज उत्तर कोरियाशी संवाद पुन्हा सुरू करण्यासाठी शी जिनपिंग यांचे सहकार्य मागितले. हा शी जिनपिंग यांचा दक्षिण कोरियाला ११ वर्षांनंतरचा पहिला दौरा होता.