जिनपिंग यांचा बायडेन यांना अप्रत्यक्ष इशारा 

बीजिंग/वॉशिंग्टन :चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी मंगळवारी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याशी ऑनलाइन चर्चा केली. या बैठकीत अमेरिका आणि चीनमधील जवळपास सर्व वादग्रस्त मुद्दय़ांवरही चर्चा करण्यात आली. या वेळी जिनपिंग यांनी तैवानबाबत हस्तक्षेप करणे ‘आगीशी खेळ असेल’ असा इशारा दिला.  

चीन आपल्या सार्वभौमत्व आणि सुरक्षाविषयक हितांचे रक्षण नक्कीच करेल. तैवानबाबत जो कोणी आगीशी खेळेल तो जळून खाक होईल, अशा शब्दांत जिनपिंग यांनी खडसावले.

बायडेन यांनी अमेरिकेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच शिखर बैठक आहे. याआधी दोघांमध्ये दूरध्वनीद्वारे संवाद झाला होता. ही चर्चा दोन फेऱ्यांमध्ये झाली आणि तीन तासांहून अधिक काळ चालली.

जिनपिंग म्हणाले की, काही अमेरिकन चीनवर नियंत्रण ठेवण्यासाठी तैवानचा वापर करू इच्छितात. अशा कृती आगीशी खेळण्यासारख्या अत्यंत धोकादायक आहेत. जो आगीशी खेळतो तो जळून जातो. चीनचे संपूर्ण एकीकरण करणे ही चिनीच्या सर्व मुला-मुलींची इच्छा आहे. आमच्याकडे संयम आहे आणि आम्ही सर्व प्रामाणिकपणे आणि शांततामय मार्गानी त्यासाठी प्रयत्न करू. जिनपिंग आणि बायडेन यांनी द्विपक्षीय संबंधांवर, देशांतर्गत आणि परराष्ट्र धोरणे, आणि परस्पर हितसंबंधांच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्दय़ांवर विस्तृत आणि सखोल चर्चा केली असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी सांगितले.