Trump Tariffs Trade War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा, ब्राझील आणि चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर ‘टॅरिफ’ (आयातशुल्क) लादले आहे. यावर आता चीनकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. तुम्हाला व्यापार युद्ध छेडायचे असेल तर ते शेवटपर्यंत लढण्यास आम्ही तयार आहोत, असा इशारा चीनने दिला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या प्रवक्त्यांनी एक्सवर सविस्तर पोस्ट केली आहे. त्यात म्हटले, “जर अमेरिकेला टॅरिफ वाढवून व्यापार युद्ध किंवा इतर कोणत्या प्रकारचे युद्ध छेडायचे असेल तर आम्ही शेवटपर्यंत ते युद्ध छेडण्यासाठी तयार आहोत.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चिनी मालावर फेब्रुवारीमध्ये १० टक्के कर लागू करण्यात आला होता, तो ४ मार्चपासून २० टक्के इतका झाला असून प्रत्युत्तरादाखल चीनने विविध प्रकारच्या अमेरिकी मालांवर १५ टक्के आयातशुल्क लादण्याचे जाहीर केले आहे.

अमेरिकेत फेन्टानिल या अंमली पदार्थाची तस्करी केली जाते. ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे की, ही रसायने चीनमधून येतात, तर मेक्सिकन टोळ्या बेकायदेशीरपणे त्याचा पुरवठा करतात. तर कॅनडामध्ये फेन्टानिलच्या प्रयोगशाळा आहेत. दरम्यान अमेरिकेत फेन्टानिलच्या अतिसेवनामुळे दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतो.

फेन्टानिल हे अमेरिकेचच पाप – चीन

चीनच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, फेन्टानिलचे संकट हे अमेरिकेचेच पाप आहे. आमच्या प्रयत्नांना सहकार्य करण्याऐवजी अमेरिकेने आमच्यावरच दोषारोप लावले आहेत. आयातशुल्क वाढवून चीनवर दबाव आणण्याचा आणि ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही त्यांची मदत केली म्हणून आम्हाला ही शिक्षा दिली जात आहे का?

ट्रम्प प्रशासनाला रोखठोक प्रत्युत्तर देताना चीनने म्हटले की, आयातशुल्क वैगरे वाढवून चीनला धमकावता येणार नाही. जर फेन्टानिलची समस्या सोडवायची असेल तर तुम्हाला राष्ट्रांना समान वागणूक द्यावी लागेल, असेही चीनने म्हटले.

चीनच्या प्रवक्त्यांनी पुढे म्हटले, “अमेरिकेच्या धमकीला आम्ही घाबरत नाही. अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाहीत. दबाव टाकणे किंवा धमकावणे हा चीनशी व्यवहार करण्याचा योग्य मार्ग ठरणार नाही.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: You want war you will have it chinas stern message to donald trump over tariffs kvg