हरयाणाचे मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा यांना रविवारी एका युवकाच्या रोषाला सामोरे जावे लागले. हुडा एका जाहीर सभेसाठी पानिपत येथे जात असताना एका युवकाने त्यांच्या श्रीमुखात भडकावली. त्यानंतर या तरुणाला तातडीने अटक करण्यात आली. त्याच्या कृत्यामागील कारण मात्र समजू शकलेले नाही. हुडा यांना झेड दर्जाची सुरक्षाव्यवस्था असतानाही हा प्रसंग घडला. हुडा त्यांच्या जिप्सी गाडीचा पुढील दरवाजा उघडा ठेवून उभे राहात उपस्थितांना अभिवादन करत होते. तेवढय़ात त्यांच्या गाडीवर एक युवक चढला आणि काही कळायच्या आतच त्याने हुडा यांच्या कानशिलात भडकावली. या घटनेने संतप्त झालेल्या हुडा यांनी संबंधित युवकाला ताब्यात घेण्याचे आदेश सुरक्षारक्षकांना दिले.