Why do stars twinkle : ताऱ्यांनी भरलेले आकाश पाहून आपण त्याकडे आकर्षित होतो. लुकलुकणारे तारे रात्रीच्या अंधारात अधिक सुंदर दिसतात; पण कधी तुम्हाला प्रश्न पडलाय का की, तारे का लुकलुकतात? आणि तारेच का लुकलुकतात; ग्रह का नाही? बीबीसीने ‘Sky At Night Magazine’मध्ये याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तारे का लुकलुकतात? (Why do stars twinkle)

जेव्हा आपण रात्रीच्या अंधारात आकाशाकडे बघतो तेव्हा असंख्य तारे प्रकाशबिंदूंच्या स्वरूपात चमकताना दिसतात. खरं तर तारे प्रत्यक्षात लुकलुकत नाहीत; परंतु पृथ्वीवरून बघताना आपल्याला तसा भास होतो. मग तारे हे लुकलुकतात, असे आपल्याला का वाटते? तर, त्याला पृथ्वीचे वातावरण कारणीभूत आहे.
जेव्हा ताऱ्यांचा प्रकाश हा पृथ्वीच्या वातावरणातून जातो तेव्हा हा प्रकाश पृथ्वीच्या वातावरणातील गरम आणि थंड हवेत मिसळतो. हवेच्या वेगवेगळ्या तापमानामुळे आणि घनतेमुळे प्रकाशाचा मार्ग बदलतो आणि हा बदल इतक्या वेगाने होतो की, आपल्याला तारे लुकलुकताना दिसतात.

अनेकदा तुम्ही ताऱ्यांना लाल, निळ्या वा इतर रंगांमध्येही लुकलुकताना पाहिले असेल. या घटनेला विज्ञानाच्या भाषेत ‘atmospheric scintillation’ म्हणतात. हा खगोलीय शब्द ताऱ्याच्या प्रकाशात होणाऱ्या जलद बदलांसाठी आणि वातावरणातील अनियमिततेमुळे निर्माण होणाऱ्या ताऱ्यांच्या रंगांसाठी वापरला जातो.

काही लोकांना लुकलुकणाऱ्या ताऱ्यांची संकल्पना खूपच रोमँटिक वाटते; पण खगोलशास्त्रज्ञांसाठी लुकलुकणारे तारे त्रासदायक ठरतात. कारण त्यामुळे दुर्बिणीतून प्रतिमा नीट दिसत नाही.

तारे का लुकलुकतात; ग्रह का लुकलुकत नाहीत? (Why do planets don’t twinkle)

तारे स्पष्टपणे लुकलुकताना दिसतात; पण ग्रह लुकलुकताना दिसत नाहीत. कारण- तारे पृथ्वीपासून खूप दूर आहेत. त्यामुळे ते छोट्या छोट्या बिंदूंप्रमाणे दिसतात आणि पृथ्वीच्या वातावरणातील परिणामामुळे ते लुकलुकताना दिसतात; पण ग्रह पृथ्वीजवळून अगदी जवळ आहे आणि त्यांच्यापासून परावर्तित होणारा सूर्यप्रकाश ताऱ्यांच्या तुलनेने पृथ्वीच्या वातावरणातून आपल्यापर्यंत सहज पोहचतो. वातावरणातील परिणामाचा तितका प्रभाव त्यांच्यावर दिसून येत नाही. त्यामुळे रात्री आकाशाकडे बघताना आपल्याला अनेकदा तेजस्वी तारा दिसतो, जो इतर ताऱ्यांप्रमाणे लुकलुकताना दिसत नाही.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why do stars twinkle and planets do not what happened in the sky at night ndj